(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray : प्रकल्पांच्या नावाखाली राज्याला लुटताय, तुमच्या लुटीचा हिशोब मांडणार, उद्धव ठाकरेंचा महायुतीला इशारा
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी येत्या दीड महिन्यात सरकारमध्ये बसलेले गद्दार बेरोजगार होणार असल्याची टीका केली आहे.
मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांच्या वचनपूर्ती निमित्त महानोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 130 कंपन्यांमध्ये 14000 युवकांना या मेळाव्यात नोकरी मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मित्रांचे खिसे भरण्यासाठी येत आहेत, अशी टीका उद्दव ठाकरेंनी केली. तर, राज्य सरकारमधील गद्दार पुढच्या दीड महिन्यात बेरोजगार होणार आहेत, असंही ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार नोकऱ्या देणारे व्हा
आपण संघर्ष करुन 1960 मध्ये मुंबई मिळवली होती. या मुंबईत मराठी माणसाला उद्योग आणि रोजगाराची दारं बंद होती. 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली. त्यादिवशी शिवसेनाप्रमुखांनी शिवतीर्थ येथे मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी स्थापना केली. नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, पण बाळासाहेबांची जी शिकवण आहे त्यानुसार नोकऱ्या घेणारे होऊ नका, नोकऱ्या देणऱ्या व्हा, इतर कंपन्यांमध्ये नोकऱ्या घेऊ, काही उद्योग असे सुरु करा की आपण इतरांना रोजगार देऊ शकलो पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
1966 ते 2024 किती वर्ष झाली, या सगळ्या काळात इतर पक्षांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आणि शिवसेनेनं काय केलं हे मोजायचं झालं तर शिवसेनेचं कर्तृत्व फार मोठं आहे, त्याचा अभिमान आहे,असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आजचं राजकारण निवडणूक जिंकण्यासाठी दंगली भडकवण्याचं राजकारण चाललं आहे. हिंदू मुस्लीम दंगल कर, समाजा समाजात तेढ पसरवं, तुम्ही त्यात व्यस्त झाला की दंगल कुणीतरी भडकवून देतात, यात मारली जातात सामान्य माणसं, पकडले जातात सामान्य माणसं, पूर्णपणे त्यांच्या मागं पोलिसांचा ससेमिरा लागतो, दंगलीचं भांडवल करुन सत्ताधारी सत्ता मिळवतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान ठाणे मुंबईची वारी करत आहेत : उद्धव ठाकरे
नोकऱ्यांसाठी आणि रोजगारासाठी शिवसेनेशिवाय इतर कोणता पक्ष काम करतो ते पुढं येऊन सांगाव. जे काही काम चाललं आहे ते घटनाबाह्य सरकारचं असेल, भाजपचं असेल ते त्यांनी सांगावं. पंतप्रधान आज ठाणे आणि मुंबईची वारी करत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. अनिल परब तुम्हाला धन्यवाद देतो, भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो, यातील सहभागी कंपन्यांना दिलासा देतो. या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या कंपन्यांना धन्यवाद, असंही ठाकरे म्हणाले.
नरेंद्र मोदी त्यांच्या मित्रांचे खिसे भरायला येत आहेत. मुंबईतील रस्ते, शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं, ती कामं पूर्ण झाली नाहीत, अशी टीका ठाकरेंनी केली. शिवसेनेचं हिंदुत्व घरातील चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. त्यांचं हिंदुत्व हे घरं पेटवणारं आहे. हा फरक लक्षात घेतल्यानंतर शिवसेना का संपवायची आहे हे लक्षात येते. माझ्या शिवसेनेचं काम बोलतंय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
स्थानिय लोकाधिकार समिती असो, भारतीय कामगार सेना आहे, हजारो लोकांना शिवसेनेमुळं नोकऱ्या मिळाल्या. यापुढे महाराष्ट्रात मराठी माणसाला प्रवेश नाही, असा बोर्ड लावून दाखवाच असं आव्हान ठाकरेंनी दिलं.
नोकऱ्यांचा पत्ता नसताना योजनांचा घोषणा, योजनांच्या घोषणा सुरु केल्यानं पोट भरत नाही. जेमतेम दीड महिना राहिलाय, मोदीजी तुम्हाला जेवढ्या फिती कापायच्या आहेत तेवढ्या कापा, येत्या विधानसभा निवडणुकीत जनता तुम्हाला, तुमच्या गद्दार मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाकरेंनी दिला.
आपण तरुण तरुणींना रोजगार देतोय, एक दीड महिन्यानंतर सरकारमध्ये बसलेले गद्दार बेकार होतील, अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाहीत. एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही. तुम्ही प्रकल्पांच्या नावाखाली राज्याला लुटत आहात, तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय राहणार नाही. राजकीय सभा नाही पण राजकारणाशिवाय आयुष्य नसतं. लोकसंख्येप्रमाणं बेरोजगारीत देखील कदाचित भारत क्रमांक एकवर असेल, असं ठाकरे म्हणाले.
इतर बातम्या :