TRP Case: रिपब्लिक वाहिनी आणि अर्णबवरील आरोप निराधार आणि बिनबुडाचे, हायकोर्टात प्रतिज्ञापत्रातून दावा
TRP scam case: रिपब्लिक वाहिनी आणि अर्णबवरील आरोप निराधार आणि बिनबुडाचे असल्याचा दावा एआरजी आऊटलर मीडियाच्यावतीनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्रातून करण्यात आला आहे.
मुंबई : कथित टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेले आरोप हे निराधार आणि बिनबुडाचे आहेत, असा दावा करणारं प्रतिज्ञापत्र एआरजी आऊटलर मीडियाच्यावतीनं बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच या आरोपपत्रात रिपब्लिक वृत्त वाहिनी आणि वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात दाखल पोलिसांकडे कोणतेही सबळ पुरावे नसल्याचेही त्यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा यासाठी अर्णबच्या रिपब्लिक वृत्त वाहिनीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर याआधी पार पडलेल्या सुनावणीमध्ये अर्णबच्यावतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडताना 8 हजार पानी दस्तावेज न्यायालयात सादर केले होते. त्याला मुंबई पोलिसांच्यावतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेत याचिकाकर्ते हे मुळात आरोपी असताना त्यांनी न्यायालयात हजारो पानी कागदपत्रे सादर करण्याला आक्षेप घेतला होता. त्याची दखल घेत याचिकाकर्त्यांना आपला युक्तिवाद सादर करण्यासाठी हायकोर्टानं 9 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती.
Arnab Goswami | अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात मुंबई पोलिसांकडून अखेर बदनामीचा दावा दाखल
त्यानुसार पोलिसांच्या आरोपपत्राला प्रतित्युत्तर म्हणून एआरजी कंपनीने खंडपीठासमोर आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं. पोलिसांनी याप्रकरणात आपल्या कंपनीतील कर्मचार्यांवर ठेवलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. वृत्त वाहिनीवरील आणि कर्मचार्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे हे संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीतून आणि द्वेषयुक्त भावनेने दाखल केल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या आणि पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीत रिपब्लिक टीव्हीने केलेल्या निर्भीडपणे वृत्तांकनासाठी त्यांच्या कर्मचार्यांना लक्ष्य केल्याचेही कंपनीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच मूळ तक्रारदार हंसा रिसर्च ग्रुपने रिपब्लिक वाहिनी किंवा आपल्या कर्मचार्यांच्या नावांचा तक्रारीत उल्लेख केलेला नाही. दुसरीकडे, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेलाही वृत्तवाहिनी किंवा कर्मचार्यांविरोधात कोणतेही पुरावे सापडलेले नसतानाही पोलिसांनी आरोपपत्रात वाहिनी आणि वृत्त वाहिनीतील कर्मचार्यांची नावे संशयित आरोपी म्हणून जोडली असल्याचे एआरजी आऊटलर मीडियाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच सहाय्यक उपाध्यक्ष घनश्याम सिंह यांच्यासह पोलिसांनी आपल्या काही कर्मचार्यांचा शारीरिक छळ केल्याचा आरोपही कंपनीने प्रतिज्ञापत्रातून केला आहे.