एक्स्प्लोर
'या' माशामुळे सुरमई, बांगडा, कुपा मासे समुद्रातून गायब!
बांगडा, सुरमई, कुपा असे चविष्ट मासे सध्या समुद्रातून गायब झाले आहेत. त्याचे कारण आहे ट्रिगर म्हणजेच काळा मासा. गेल्या पाच महिन्यात महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत तो आल्याने बाकी मासे मिळेनासे झाले आहेत.

मुंबई : गेल्या काही महिन्यात तुम्ही खाणारे चविष्ट मासे महाग झाले आहेत असं वाटतंय का? बांगडे, सुरमई असे मासे मिळत नसल्याची तक्रार मच्छीवाला करतोय का? तर ते खरं आहे. याचे कारण आहे अगदी हातापेक्षा लहान असलेला काळा मासा. ज्याचं खरं नाव आहे ट्रिगर फिश. हा मासा साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून महाराष्ट्र आणि मुंबईच्या लगतच्या किनाऱ्याजवळ आढळून आला आहे. हा मासा झुंडमध्ये फिरतो आणि बाकी माशांवर हल्ला करतो, त्यांना चावतो आणि पळवून लावतो, असं मुंबईच्या मच्छीमारांचे म्हणणं आहे. हा मासा लक्षद्वीपच्या महासागरात आढळतो. मात्र गेल्या काही महिन्यात पूर्व किनारपट्टीकडे झालेली वादळे, वातावरणातील बदल, समुद्र प्रवाहातील बदल यामुळे हा मासा मोठ्या प्रमाणात मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आला आहे. इतकंच नाही तर तो इथे प्रजनन देखील करत आहे. हा मासा अतिशय आक्रमक असून, तो माशांचं खाद्य असलेलं प्लांटन खातो. तसंच आपण खात असलेले बांगडा, सुरमई, कुपा अशा माशांवर या काळा माशांच्या झुंडी हल्ला करतात आणि त्यांना मारुन टाकतात. या माशाचे दात तीक्ष्ण आहेत, ज्यामुळे तो हल्ला करण्यात तरबेज आहे. परिणामी लहान मोठ्या सर्वच मच्छीमारांचे आता मोठे नुकसान होत आहे. मासळी नसल्याने बाजारात भाव देखील वाढले आहेत. मुंबईच्या एकट्या ससून डॉकवर रोज 8 ते 10 टन हा मासा जाळ्यात येतो. इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. याचा जबर फटका मासेमारी व्यवसायावर होत आहे. दुसरीकडे अनेक संघटनांनी केंद्रीय समुद्री मात्सकी संशोधन संस्था तसंच राज्य सरकारकडे याबाबत पत्र लिहून तक्रार केली आहे. सीएमएफआरच्या शास्त्रज्ञांनी या माशावर संशोधन सुरु केलं आहे.
आणखी वाचा























