मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, हार्बरवरील प्रवाशांना दिलासा
पश्चिम रेल्वेवर सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेवर परळ टर्मिनसचे कामानिमित्त आणि पश्चिम रेल्वेवरील सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वे मध्य रेल्वेवर परळ टर्मिनसचे काम सुरु आहे. त्यामुळे भायखळा ते माटुंगा डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.या दरम्यान सीएसएमटीहून सकाळी 8 वाजून 49 मिनिटांपासून ते 5 वाजून 48 मिनिटांपर्यंत भायखळा येथून माटुंग्याकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा या स्थानकांवर थांबतील. या लोकलला चिंचपोकळी, करीरोड या स्थानकांवर थांबा मिळणार नसून परळ स्थानकावरील फलाट क्रमांक 3 वर थांबविण्यात येतील.
पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वेवर सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक काळात चर्चगेट दिशेकडे जाणाऱ्या सर्व जलद लोकल विरार, वसई रोड ते बोरीवलीपर्यंत धीम्या मार्गावरुन धावतीस. तसेच विरारला जाणाऱ्या जलद लोकल बोरीवली ते वसई रोड, विरारपर्यंत धीम्या मार्गावरून चालविण्यात येतील.