ठाणे खाडीसंदर्भात मोठी बातमी... खाडीला मिळणार 'रामसर' दर्जा!
ठाणे खाडी ही महाराष्ट्रातील तिसरी रामसर साईट म्हणून घोषित होईल, या आधी नाशिक येथील नांदूर मध्यमेश्वर आणि बुलढाणा येथील लोणार सरोवर यांना रामसर दर्जा देण्यात आला आहे.
ठाणे : ठाणे खाडीला 'रामसर' दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून कांदळवन कक्षाने तो राज्याच्या पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाला पाठवलाय. त्यावर राज्य पाणथळ जागा प्राधिकरणाची मंजुरी मिळाली की केंद्राला हा प्रस्ताव पाठवण्यात येईल. काल राज्य पर्यावरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी ही माहिती दिली. असे झाल्यास ठाणे खाडी ही महाराष्ट्रातील तिसरी रामसर साईट म्हणून घोषित होईल, या आधी नाशिक येथील नांदूर मध्यमेश्वर आणि बुलढाणा येथील लोणार सरोवर यांना रामसर दर्जा देण्यात आला आहे.
ठाणे ही आशियातील सर्वात मोठी खाडी असून एकूण 6522.5 हेक्टर क्षेत्र यात येते, त्यापैकी 1690.5 हेक्टर ठाणे फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित आहे, तर 4832 हेक्टर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित आहे, यात भारतातील 20 टक्के कांदळवनाच्या प्रजाती आहेत, ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो सोबत असंख्य स्थलांतरित पक्षांच्या जाती इथे येतात, कांदळवनात आढळणारे विविध मासे, कीटक, फुलपाखरे इथे आढळतात. जर रामसर दर्जा मिळाला तर संपूर्ण ठाणे, नवी मुंबई मधील कांदळवन त्यात येईल, या संपूर्ण प्रदेशाचे संरक्षण होईल, इथल्या पर्यावरणाचे संरक्षण होईल, या कांदळवनात आंतरराष्ट्रीय नियम लागू होतील. या घोषणेनंतर पर्यावरण प्रेमी संस्था अतिशय आनंदित असून, 20 वर्ष्यापासून करत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
'रामसर' म्हणजे काय?
तर, 1971 साली इराणमधील 'रामसर' शहरात 'रामसर परिषद' पार पडली. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे असे ठरले. यासाठी पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा करण्यात आला. भारताने 'रामसर' करारावर 1982 साली सही करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले. सध्या जगातील 2410 पाणथळींना 'रामसर' चा दर्जा प्राप्त आहे, तर गेल्या 35 वर्षांमध्ये भारतातील 27 पाणथळींना 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळाला आहे.