स्वाईन फ्ल्यू, कोरोनाची लक्षणे सारखीच, उपचार वेगळे; आजार कोणता कसं समजणार ?
दोन्ही आजारासाठी टेस्ट करणे गरजेचे आहे. दोन्हीसाठी नेजल swab टेस्ट केली जाते. ज्यामधून आपल्याला हे स्पष्ट होईल की नेमका आजार कोणता आहे.

मुंबई : एकीकडे दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना दुसरीकडे H1N1 स्वाइन फ्ल्यू आजाराने सुद्धा आता डोकं वर काढलं आहे. स्वाईन फ्ल्यू आजाराचे रुग्ण समोर येत असताना स्वाईन फ्ल्यू आणि कोविड 19 ची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे उपचार देताना आधी आजार नेमका कोणता आहे? याचं निदान डॉक्टरांकडून केलं जातंय. मागील वर्षी मुंबईत 44 स्वाईन फ्ल्यूच्या केसेस आढळल्या होत्या. त्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्ल्यूच्या केसेस या 50 टक्क्यांनी कमी असल्याचं मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले आहे. तरीसुद्धा, रुग्णांमध्ये नेमका कोणता आजार आहे? याचे निदान करणे या परिस्थितीत काहीसे अवघड असल्याचं काही डॉक्टरांचं म्हणणं आहे.
कोविड 19 आणि स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणे सारखीच आहेत. ही लक्षणे ओव्हरलॅप होतयेत त्यामुळे स्वाईन फ्ल्यू आणि कोविड 19 आजार ओळखणे हे थोडं अवघड आहे. स्वाईन फ्ल्यूमध्ये नाकातून पाणी गळणे, सर्दी होणे, अशी लक्षणे आढळतात तर कोविड 19 मध्ये ताप येणे, चव जाणे, वास न येणे अशी लक्षणे आढळतात. उपचार पद्धती दोन्ही आजारांची वेगळी असल्याने आजार नेमका कोणता आहे हे ओळखणे सुरुवातीला गरजेचे असल्याचं मत ग्लोबल रुग्णालयाचे छातीरोग तज्ज्ञ डॉ. हरीश चाफले यांनी मांडले. शिवाय त्यांनी या दोन्ही आजारांबाबत समोर येत असलेल्या प्रश्नांची उत्तरं एबीपी माझाशी बोलताना दिली.
कसा ओळखणार आजार? स्वाइन फ्ल्यू की कोविड 19?
दोन्ही आजारासाठी टेस्ट करणे गरजेचे आहे. दोन्हीसाठी नेजल swab टेस्ट केली जाते. ज्यामधून आपल्याला हे स्पष्ट होईल की नेमका आजार कोणता आहे.
कोणती टेस्ट करायची?
बायोफायर टेस्टमध्ये कळू शकेल की नेमका कोणत्या वायरसचं इन्फेक्शन आहे? कोणता आजार आहे. शिवाय, कोविडसाठी आरटीपीसीआर आणि अँटीजन टेस्ट तर केल्याच जातात.
एक लस घेतली तर दोन्ही आजारासाठी प्रभावशाली असेल, लस परिणाम दाखवेल?
आजार वेगळे तशी लस वेगळी आहे. त्यामुळे दोन्ही आजारासाठी लस वेगळ्या आहेत. स्वाईन फ्ल्यूसाठी इन्फ्युलन्जा लस घ्यावी लागेल. तर कोविड 19 साठी कोविशील्ड, कोव्हॅक्सीनचं लसीकरण सुरू आहे
काय काळजी, खबरदारी घेतली पाहिजे?
दोन्ही आजार होऊ नये यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे. शिवाय स्वाईन फ्ल्यूसाठी हात स्वच्छ ठेवणे, सॅनिटायजर वापर करणे महत्वाचे आहे. ज्या प्रकारची खबरदारी आपण कोविड 19 साठी सुद्धा घेत आहोत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
