राज्यात कोरोना लसीकरणासाठी राज्य सरकार सज्ज; आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस मिळणार
कोरोना लसीकरणासाठी राज्य सरकार सज्ज झाले असून राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक आज पार पडली. कोरोना लसीकरण पूर्वतयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला.
मुंबई : कोरोना संसर्गावरील लस काही दिवसांत बाजारात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लसीकरणासाठी तयारी सुरु केली आहे. कोरोना लसीकरणासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक आज झाली. यावेळी राज्यात कोरोना लसीकरणासाठी सुरु असलेल्या पूर्वतयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सादरीकरण केले.
लसीकरणासाठी विविध स्तरावर समन्वय यंत्रणा करण्यात आली आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लस मिळणार.. लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून पहिल्या गटात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात 50 वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत. अशा 50 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
लसीकरणासाठी राज्य शासन सज्ज लसीकरणासाठी राज्य शासनाने तयारी केली असून आतापर्यंत शासकीय आरोग्य संस्थेतील 99 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा पूर्ण करण्यात आला आहे. तर खासगी आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांचा डेटा 78 टक्के पूर्ण झाला आहे. लस टोचण्यासाठी 16 हजार 245 कर्मचाऱ्यांची को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत को-विन पोर्टलवर 90 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सुमारे दोन लाख 60 हजार शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण पथकामध्ये पाच सदस्यांचा समावेश असेल. राज्यात शीतगृहांची उपलब्धता असून राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर 34, महामंडळांचे 27 असे शीतगृह तयार असून 3 हजार 135 साखळी केंद्र उपलब्ध आहेत.
Corona Vaccine | तुम्हाला कोरोनाची लस कशी मिळणार? लसीकरण मोहिमेची सविस्तर माहिती पाहा!