Balasaheb Thackeray Birth Anniversary | महाराष्ट्रातील भाजपच्या अस्तित्त्वाचं श्रेयही बाळासाहेबांचं- संजय राऊत
राज्यात भाजपचं सध्या असणारं स्थान पाहता या पक्षाला गावखेड्यात पोहोचवणारेही खुद्द बाळासाहेबच होते ही बाब त्यांनी स्पष्ट केली.
Balasaheb Thackeray Birth Anniversary शिवसेना पक्षप्रमुख, हिंदुहृदयसम्राट अशी ओळख असणाऱ्या आणि अर्थातच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात कमालीचं वजन असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती. याचनिमित्तानं शिवतीर्थापासून ते अगदी गावखेड्यापर्यंत शिवसैनिक आजच्या दिवशी या लोकनेत्याला स्मरत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला.
मराठी भाषा, अस्मिता, महाराष्ट्र, मराठी माणूस या साऱ्या घटकांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल राऊतांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय राज्यात भाजपचं सध्या असणारं स्थान पाहता या पक्षाला गावखेड्यात पोहोचवणारेही खुद्द बाळासाहेबच होते ही बाब त्यांनी स्पष्ट केली.
काही वर्षे मागे जात, गतकाळ आठवत महाराष्ट्रात त्यावेळी भाजप नव्हती, शिवसेनेचंच तेव्हा अस्तित्वं होतं. त्यावेळी बाळासाहेबांनी भाजपशी युती केली. त्यानंतर महाराष्ट्रातील गावागावात भाजपचाही प्रचार आणि प्रसार झाला. आमच्यासाठी ही बाब अभिमानास्पद होती. कारण, सर्वजण 'गर्व से कहो हम हिंदू है' या घोषणेच्या बळावर एकत्र आले होते, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपनं शिवसेनेच्या हिंदुत्त्वावर प्रश्न उपस्थित करु नयेत
महाविकासआघाडी सरकारच्या निमित्तानं शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली. ज्यानंतर सेनेवर भाजपकडून वारंवार हिंदुत्त्वाच्या प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. त्याबाबत प्रतिक्रिया देत राऊतांनी भाजपनं यासंदर्भात कोणतेही प्रश्न उपस्थित करु नयेत असं ठणकावून सांगितलं. 'भाजपनं कोणतेही प्रश्न निर्माण करु नये, कारण त्यांची प्रश्नपत्रिका अजून महाराष्ट्राच्या चाचणी परीक्षेतही आलेली नाही', असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मुंबईत त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणर आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती असेल. याचसंदर्भात माहीती देत राऊत म्हणाले, एकसंध महाराष्ट्र, जातीपातीविरहीत महाराष्ट्र आणि राजकारणापलीकडल्या मराठी माणसानं एकत्र येऊन महाराष्ट्र घडवावा असा बाळासाहेबांचा मंत्र होता. म्हणूनच त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी सर्वच पक्षातील महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती असेल.