सत्तेची वाट पाहणाऱ्या संजय राऊतांना वेड लागलं, त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा- रावसाहेब दानवे
भाजपच्या पत्रकार परिषदेत भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे, सोबतच त्यांच्या तब्येतीला उद्देशून त्यांना वेड लागलंय, उपचाराची गरज आहे असं दानवे म्हणालेत, काय म्हणाले सविस्तर वाचा...
मुंबई: आपलीच सत्ता येईल असं वाटत असताना, वाट पाहत संजय राऊत यांना वेड लागले आहे, त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे, अशी टीका भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी राऊतांवर केली. आज मुंबईत भाजपची पत्रकार परिषद सुरु असताना दानवेंनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं. सत्तास्थापनेदरम्यान खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात अचानकपणे दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांची अॅंजिओप्लिस्टिची सर्जरी करण्यात आसी होती. याच संदर्भात दानवेंनी संजय राऊतांना इस्पितळात दाखल करण्याची गरज आहे असा जोरदार घणाघात केला. विशेष म्हणजे त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, सत्तास्थापनेच्या गडबडीत आपली सत्ता येईल अशी वाट पाहत त्यांना वेड लागलं आहे असं म्हणत रावसाहेब दानवेंनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे.
राऊतांबद्दल बोलत असताना राम मंदिर प्रकरणी निकालाचा दानवेंनी उल्लेख केला. याप्रकरणी राम हा काल्पनिक आहे, वास्तव नाही असा दावा कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला होता आणि संजय राऊतांनी 'सामना'मध्ये कपिल सिब्बलांबद्दल एक लेख लिहिला होता, ज्यात "कपिल सिब्बल दारु पिऊन उच्छाद मांडणारा माकड आहे" असे शब्द खुद्द संजय राऊत यांनी वापरले होते. या सर्व राजकीय नाट्यामध्ये शिवसेनेला अजूनही स्वत:चा साधा वकील शोधता आला नाही त्यामुळे स्वत: टीका केल्यानंतर त्याच माणसाची मदत घेऊन शिवसेना कोर्टात केस लढतेय, असं दानवे म्हणाले.
सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत आता भाजप सर्वात पुढे आहे आणि याला सोबत राष्ट्रवादीच्या अजित पवार यांची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून राजकीय वर्तुळात वादळ आल्याचं वातावरण निर्माण झालंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी झालेल्या प्रकारावर टीका केली होती. मध्यरात्री हे सर्व का केलं असा प्रश्न विचारत रात्रीत फक्त पापं होऊ शकतात असंही राऊतांनी म्हटलं होतं. तर शपथविधीची वेळ रामप्रहरी होती असं प्रत्युत्तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊतांना दिलं होतं.
संजय राऊत यांनी काल एका पत्रकार परिषदेत असं म्हटलं होतं की "भाजपकडे जर सत्ता नसेल तर नेते वेडे होतील आणि त्यांचं मानसिक संतुलन बिघडेल" याच वाक्याला उद्देशून आज दानवेंनी उलट राऊतांनाच वेड लागलंय असं म्हटलं. काय म्हणाले होते संजय राऊत? पाहा व्हिडीओ
Sanjay Raut PC | भाजपकडे सत्ता नसेल तर नेते वेडे होतील, त्यांच मानसिक संतुलन बिघडेल : संजय राऊत | ABP Majha