(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mangesh Satamkar Shiv Sena : तिकडे प्रवेश अन् इकडे 'त्या' महिलेची तक्रार मागे; मंगेश सातमकरांना दिलासा
Mangesh Satamkar Shiv Sena : शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असताना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांना दिलासा मिळाला. सातमकर यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाची तक्रार तरुणीने मागे घेतली आहे.
Mangesh Satamkar Shiv Sena : शिवसेना शिेदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश करत असताना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) माजी नगरसेवक मंगेश सातमकर (Mangesh Satamkar) यांना दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेत सातमकरांना क्लीन चिट दिली आहे. याबाबते महिलेचे प्रतिज्ञापत्र एबीपी माझाच्या हाती लागले आहे. ठाकरे गटाचे नगरसेवक आज रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
सातमकर यांच्यावर आरोप
शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर एका 29 वर्षीय तरुणीने मे महिन्यात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या आरोपा प्रकरणी तरुणीने वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात याविषयीची लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, अँटॉप हिल येथे पीडित मुलीसोबत गैरप्रकार घडल्याने अँटॉप हिल पोलीस ठाण्यात मंगेश सातमकर यांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रार करणारी तरुणी सातमकर यांच्यासोबत काम करणारी होती. सातमकर यांनी लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप तरुणीने केला होता. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तरुणीने पोलीस ठाण्यात सातमकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
तरुणीकडून क्लीन चीट
तरुणीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, आम्ही एकाच क्षेत्रात कार्यरत असल्याने आमच्या दोघांमध्ये वाद झाले होते. त्यातून काही गैरवर्तणूकदेखील झाली. मात्र, आता आम्हा दोघांनाही आपली चूक झाली असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे हे प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्याचे ठरवण्यात आले आहे. ही तक्रार मागे घेण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचे तरुणीने म्हटले आहे. ही तक्रार आपण स्वखुशीने मागे घेत असून मंगेश सातमकर यांच्याविरोधातील तक्रार मागे घेत असल्याचे तरुणीने म्हटले.
ठाकरेंना धक्का
काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबई महापालिकेतील नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याआधी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता सातमकर यांनीदेखील साथ सोडणे हा ठाकरे गटाला धक्का असल्याचे मानले जात आहे.
मंगेश सातमकर कोण आहेत?
मंगेश सातमकर हे जुने शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. 1994 मध्ये ते मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडले गेले होते. त्यानंतर सायन कोळीवाडा विभागातून 2002 मध्ये पुन्हा एकदा मुंबई महापालिकेत निवडून गेले. मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती, शिक्षण समिती आदी विविध समित्यांमध्ये त्यांनी काम केले. मागील मुंबई महापालिकेच्या कार्यकाळात ते शिक्षण समितीचे अध्यक्ष होते.