Sanjay Raut : सोमय्यांच्या भ्रष्टाचारावर बोलल्यावर मानहानी कशी? न्यायपालिका दबावाखाली, पण हिशोब चुकता केला जाईल; जामीन मिळाल्यानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Vs Medha Somaiya Case : शौचालय घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत चर्चा झाली, त्यावर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. मग त्यावर बोलल्यावर मानहानी कशी झाली असं संजय राऊत यांनी विचारला.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना न्यायालयाने अंशतः दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांना 15 हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी निकालाला 30 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. आपल्या आरोपांनंतर मेधा सोमय्यांच्या मनाला वेदना होत असतील तर त्यांचे पती इतरांवर बिनबुडाचे आरोप करताना इतरांना वेदना होत नसतील का असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. न्यायपालिका दबावाखाली काम करत असून सगळ्यांचा हिशोब चुकता केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना कोर्टाने दोषी ठरवलंय. सोमय्या दाम्पत्याने मिरा भायंदर महापालिका क्षेत्रात 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने राऊतांना दोषी ठरवत 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंडही ठोठावला आहे.
शौचालय घोटाळ्याप्रकरणी अनेकांनी तक्रारी केल्या, मात्र माझ्याच आरोपांनी बदनामी कशी झाली असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
ज्या भ्रष्टाचारावर विधानसभेत चर्चा झाली त्यावर वक्तव्य केलं तर ती मानहानी कशी ठरते असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. संजय राऊत म्हणाले की, शौचालय घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत चर्चा झाली. त्यावर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.
पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी मोदक खायला जातात
संजय राऊत म्हणाले की, "न्यायालयाने म्हटलंय की याचिकाकर्त्यांच्या मनाला वेदना झाल्या. पण जेव्हा त्यांचे पती भंपक आणि खोटे आरोप करतात त्यावेळी त्यांच्या मनाला वेदना होत नाहीत का?आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले त्यावेळी आमच्या मनाला वेदना होत नसतील का? न्यायव्यवस्था ही कुणाची तरी रखेल झाली अशी आण्णा भाऊ साठे म्हणाले आहेत. सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला जातात त्यावेळी आमच्यासारख्यांनी न्यायव्यवस्थेकडून काय अपेक्षा कराव्यात?"
आमच्या आरोपांवर मेधा सोमय्या यांच्या मनाला वेदना झाल्या असतील तर त्यांच्या पतीला नंगा पाहिल्यानंतर त्यांना वेदना झाल्या नाहीत का? असा सवाल संजय राऊतांनी विचारला.
न्यायपालिका दबावाखाली आहे
न्यायपालिका दबावाखाली असून प्रत्येक पदावर संघाची व्यक्ती बसली आहे, बाहेरून काम नियंत्रित केलं जातंय असा आरोप संजय राऊत यांनी केला. मी पुराव्यानिशी बोलतोय, पण आरोपी कुणाला बनवलं? भाजपच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवलं जातंय. पण वेळ आल्यानंतर सगळ्यांचा हिशोब चुकता केला जाईल.
Mira Bhaindar Toilet Scam : काय आहे शौचालय घोटाळा?
किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा यांनी 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. मिरा भाईंदर शहरात 2022 साली 154 सार्वजनिक शौचालयं बांधण्याचे कंत्राट निघालं होतं. त्यातील 16 शौचालयांचे काम मेधा सोमय्यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं होतं. यात सीआरझेडचे उल्लंघन करण्यात आलं, कामात बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली आणि मिरा भाईंदर पालिकेची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांच्या विरोधात न्यायलयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.
ही बातमी वाचा: