पहिल्या पत्नीशी निकाह करताना समीर वानखेडे मुस्लिम, वानखेडेंचं पहिलं लग्न लावणाऱ्या काझींचा दावा
पहिल्या पत्नीशी निकाह करताना समीर वानखेडे (Sameer Wankhede) मुस्लिम होते, असा दावा समीर वानखेडे यांचा निकाह लावणाऱ्या काझी मौलाना मुजम्मिल अहमद यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
Nawab Malik VS Sameer Wankhede : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशात आता समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न (निकाह) लावणाऱ्या काझींनी नवा दावा केला आहे. पहिल्या पत्नीशी निकाह करताना समीर वानखेडे मुस्लिम होते, असा दावा समीर वानखेडे यांचा निकाह लावणाऱ्या काझींनी केला आहे. निकाह लावणाऱ्या मौलाना मुजम्मिल अहमद यांनी एबीपी माझाशी बोलताना हा दावा केला आहे. समीर वानखेडे यांचे वडीलही मुस्लिम असल्याचा दावा काझी अहमद यांनी केला आहे. समीर वानखेडे खोटं बोलत असल्याचा आरोप देखील काझी यांनी केला आहे. मौलाना मुजम्मिल अहमद यांनी म्हटलं आहे की, जर त्यांनी हिंदू सांगितलं असतं तर निकाहच झाला नसता. सर्व मुसलमान होते. जर मुसलमान नसते तर शानदार निकाह झाला नसता. मुसलमान नसते तर हे नातंच बनलं नसतं.
समीर वानखेडे यांच्या त्या लग्नातील फोटो काझी मुजम्मिल अहमद यांना दाखवला असता तो खरा फोटो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लोखंडवालामध्ये असलेल्या एका हॉलमध्ये शानदार पद्धतीनं झाला होता. तसेच मेहरची रक्कम 33 हजार होती, असंही त्यांनी सांगितलं. समीर वानखेडे खोटं बोलत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. निकाहच्या वेळी 2 हजार लोकं उपस्थित होते. दोन हजार लोकं उपस्थित होते तर विचार करा किती मोठा सोहळा असेल, असंही ते म्हणाले. समीर दाऊद असं नाव फॉर्मवर लिहिलं होतं, असंही त्यांनी सांगितलं समीर, त्यांचे वडील, त्यांची बहिण सर्वजण मुस्लिम आहेत, असा दावा त्यांनी केला.
मी सादर केलेले पुरावे खोटे ठरले तर राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेईन : नवाब मलिक
काय म्हणाले समीर वानखेडे
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनतर समीर वानखेडे यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी मी जन्मानं हिंदू होतो आणि आताही हिंदूच आहे, असं म्हटलं आहे. समीर वानखेडे यांनी एबीपी माझाला माहिती देताना म्हटलं आहे की, "हो, मी मुस्लिम पद्धतीनं लग्न केलं कारण माझ्या आईची तशी इच्छा होती. माझी आई जन्मानं मुस्लिम होती आणि तिनं माझ्या वडलांशी लग्न करून हिंदू धर्म स्वीकारला होता. मी सेक्युलर व्यक्ती आहे. मी ईदही साजरी करतो आणि दिवाळीही साजरी करतो. मी मंदिरातही जातो आणि मशिदीतही जातो. मी आईच्या इच्छेनुसार, मुस्लिम धर्माच्या रितीप्रमाणे लग्न केल्यानंतर स्पेशल मॅरेज एक्टप्रमाणे लग्न रजिस्टर केलं आहे. म्हणून हा काही गुन्हा झाला का?" पुढे बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, "माझ्याविरोधात केले जात असलेले आरोप अत्यंत खालच्या दर्जाचे आहेत. मी धर्म बदलला आहे का? मी जन्माने हिंदू होतो आणि आताही हिंदू आहे. मुस्लिम मुलीशी लग्न केल्यानं मी मुस्लिम होतो का?"
...तर राजकारणातून संन्यास घेईल- नवाब मलिक
जर मी सादर केलेले पुरावे खोटे ठरले तर मी राजीनामा देईल आणि राजकारणातून संन्यास घेईल, असं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले की, क्रांती रेडकर आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना जीवाचा धोका असेल धमकी येत असेल तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटावे. मी ही मागणी करतो की अमित शाह यांनी वानखेडे यांच्या कुटुंबाला झेड सुरक्षा द्यावी, असंही मलिक म्हणाले. सर्टिफिकेटचे आरोप खोटे ठरले तर मी राजकारणातून संन्यास घेईल. आणि ते खोटे ठरले तर किमान त्यांनी माफी मागावी. त्यांची नोकरी तर जाणारच आहे, असंही ते म्हणाले.
क्रूझ पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सप्लायर
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांच्याकडून आरोपांचा 'सिलसिला' सुरुच आहे. आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी पुन्हा वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी म्हटलं आहे की, क्रूझ पार्टी प्रकरणात एक बाब समोर आली की या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सप्लायर होता. त्याठिकाणी त्याची गर्लफ्रेंड देखील होती. बंदूक घेऊन तो दाढीवाला त्याठिकाणी होता. त्याची समीर वानखेडेंसोबत मैत्री आहे. गोव्यात देखील यांनी मोठे व्यवहार केले होते, असा आरोप मलिक यांनी केला आहे. आम्ही एनसीबीला सांगितलं होतं की एक दाढीवाला व्यक्ती होता. त्याची मैत्रीण देखील त्याठिकाणी होते. त्यांचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत आम्ही ते व्हिडिओ देऊ, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. आम्ही त्या चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. जर त्यांना दाढीवाला त्यांना मिळत नसेल त्याचे व्हिडिओ मिळत नसतील तर मी त्याचे पुरावे अधिकारी ज्ञानेंद्र सिंग यांना देईल. त्यांनी तसे पुरावे मागावेत, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :