एक्स्प्लोर
Advertisement
खडसेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन, शिवसेनेचे भाजपला जोरदार टोले
मुंबई: देश हादरवण्याच्या वक्तव्यावरुन जरी खडसेंनी सारवासारव केली असली तरी यावरुन शिवसेनेनं भाजपला चांगलेच टोले लगावले आहेत. खडसेंच्या भाषणातला रोख विरोधकांपेक्षा स्वकीयांवरच जास्त होता, पण यात आम्हाला पडण्याचं काही कारण नाही असं म्हणत शिवसेनेने भाजपला चिमटे काढले आहेत.
यापुढे भाजपमधली अंदर की बात खडसेंनी उघड केली तर पक्षांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाला भाजपला तयार रहावं लागेल असंही सामनात म्हटलं आहे.
एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:
नाथाभाऊंचेही ‘मनोगत’
मंत्रीपदावरून जावे लागलेले एकनाथराव खडसे यांनी छातीठोकपणे सांगितले आहे की, ‘स्वपक्षातील गद्दारांमुळेच आपल्याला सत्तेतून जावे लागले.’ भाजप परिवारातील नाथाभाऊंनी असेही सत्यकथन केले की, ‘माझी बदनामी हे ठरवून केलेले कृत्य आहे.’ जळगावातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खडसे यांनी मन ढसाढसा मोकळे केले आहे. खडसे यांनी मन मोकळे केले असले तरी बर्याच गोष्टी मनात गाठ मारून बांधून ठेवल्या आहेत. ही गाठ योग्य वेळी सोडीन व योग्य वेळी गुपिते उघडी करीन तेव्हा देश हादरल्याशिवाय राहणार नाही, असेही खडसे यांनी सांगून टाकले. खडसे यांनी जे सूचक इशारे दिले आहेत ते पाहता भविष्यात एखादे छोटे महाभारत घडले तरी आश्चर्य वाटायला नको.
खडसे यांचे जे ‘मनोगत’ प्रसिद्ध झाले आहे त्याचा रोख विरोधकांपेक्षा स्वपक्षीयांवरच असला तरी आम्हाला त्यात पडण्याचे कारण नाही. खडसे यांच्या बाबतीत जे घडले तो त्यांच्या पक्षातला ‘अंदर का’ मामला आहे. त्यामुळे नक्की काय झाले याची ‘अंदर की बात’ खडसे यांनाच उघड करावी लागणार आहे व त्यावेळी जे स्फोट होतील त्या हादर्यांना सामोरे जाण्यासाठी पक्षांतर्गत आपत्ती व्यवस्थापनास सावधान राहावे लागेल. कारण गुपिते उघड केली तर देश हादरेल असे श्री. खडसे यांनी सांगितले आहे.
खडसे हे चाळीस वर्षे राजकारणात आहेत व त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी कष्ट घेतले आहेत व त्यासाठी जळगावातील अनेक प्रामाणिक शिवसैनिकांवर वार केले आहेत. सत्तेचा वारेमाप गैरवापरही त्यांनी त्यासाठी केला हे सर्वश्रुत असले तरी केवळ त्यामुळे खडसे यांच्यावर आमचा आकस नाही. शिवाय जळगावातील शिवसैनिकही खडसे यांना पुरून उरले आहेत. राजकीय मैदानात हे असे फटाके फुटायचेच. पण खडसे यांचे मंत्रीपद जाताच जळगावातील शिवसैनिकांनी फटाके फोडले हे खडसे यांचे दु:ख नसून स्वपक्षातच ‘दिवाळी’ साजरी झाली या वेदनेचा स्फोट त्यांच्या मुखातून झाला आहे.
शिवसेनेशी युती आपणच तोडल्याची शेखी ते एखाद्या शौर्यचक्राप्रमाणे मिरवीत होते. शिवसेनेशी युती तोडली म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला, पण माझ्या वाट्याला हे काय आले? असा प्रश्न खडसे यांनी केला. खडसे यांची वेदना समजून घेतली पाहिजे. खडसे यांनी शिवसेनेशी युती तोडण्यात पुढचे पाऊल टाकले. कारण त्यावेळी देशात मोदी यांची लाट होती व त्या लाटेत ओंडके व काटक्याही तरंगल्या. आम्हाला त्याची खंत नाही. पण युती तोडली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, असे खडसे म्हणतात. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार कदाचित झाले नसते. कारण पाठीत वार करण्याची अवलाद शिवसेनेची नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर आभाळ कोसळले असते काय? याचे चिंतन करण्यास खडसे आता मोकळे आहेत. खडसे यांच्यावर अनेक आरोपांच्या फटाक्यांची माळच लागली. मात्र त्यांच्यावर लागलेला ‘दाऊद’ संबंधाचा आरोप मान्य होण्यासारखा नाही.
दाऊदशी संबंध जोडून खडसे यांच्या देशभक्तीवरच कलंक लावण्याचा प्रकार हा त्यांच्यावर अन्याय ठरतो व याबाबतीत त्यांचे ऐकून घेतले नाही हा त्याहून मोठा अन्याय ठरू शकतो. खडसे यांच्याशी राजकीय लढायला आम्ही समर्थ आहोत. पण एखाद्या विषयात नाहक बदनामी घडवून राजकीय पोळ्या भाजणारे आम्ही नव्हेत. हे सत्य सांगण्याची हिंमत आमच्यात आहे व त्याबद्दल खडसे यांच्या पक्षातील कुणाचा आक्षेप असेल तर त्यांना बोंबलण्याचा आणि ‘सामना’ जाळण्याच्या धमक्या देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement