एक्स्प्लोर
मुंबईत फिल्मी स्टाईल गाडी अडवून साडे सोळा लाख लुटले
रेल्वे प्रशासनाची ही रक्कम होती. आज दुपारी साडे चार वाजता ही घटना घडली. दिवसाढवळ्या ही घटना घडल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबई : फिल्मी स्टाईल गाडी अडवून दिवसाढवळ्या 16 लाख 58 हजार 212 रुपये लुटल्याची घटना सायन-पनवेल हायवेवर मानखुर्दजवळ घडली. रेल्वे प्रशासनाची ही रक्कम होती. आज दुपारी साडे चार वाजता ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाने एका खाजगी कंपनीला रेल्वे स्थानकात तिकीट रुपाने जमा होणारी रोख रक्कम रेल्वे स्थानकातून कार्यालयात पोहचवण्याचं कंत्राट दिलं आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकातून तिकीट रुपाने जमा झालेली रक्कम तसेच इतर कंपन्यांची रक्कम जमा करुन या कंपनीचे तीन कर्मचारी गोरेगावच्या कार्यालयाच्या दिशेने इको गाडीने निघाले होते. या कर्मचाऱ्यांनी इतरही रेल्वे स्थानकातून रक्कम गोळा केली होती. लोखंडी पेट्यांच्या माध्यमातून ही रोख रक्कम गोरेगाव येथील कार्यालयाकडे हे कर्मचारी घेऊन जात असताना सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या पुढे असलेल्या पुला जवळ त्यांच्यासमोर एक मारुती अल्टो कार आडवी आली. या कारमधून चार इसम उतरले आणि त्यांनी हातातील हॉकी स्टिक आणि इतर शस्त्रांच्या मदतीने या गाडीच्या काचा फोडत आतील तिघांना धमकावून गाडीमधील साडे सहा लाख रुपयांची रोकड असलेल्या दोन लोखंडी बॅग घेऊन पळ काढला. एक बॅग या गाडीत तशीच सुरक्षित राहिली. घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच परिमंडळ सहाचे उपायुक्त शहाजी उमाप हे घटनास्थळी दाखल झाले. मानखुर्द पोलिसांनी यात दरोड्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
आणखी वाचा























