एक्स्प्लोर
Viral Check | ऐन गर्दीत रेल्वे प्लॅटफॉर्मवर धावणाऱ्या रिक्षाचं व्हायरल सत्य
गर्दीच्या वेळी ज्या प्लॅटफॉर्मवर माणसांनाही चालायला अवघाड पडतं त्यावर रिक्षा दिसल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. ही रिक्षा प्लॅटफॉर्मवर कशी आली? का आली? अशा अनेक प्रश्नांचा शोध घेण्यासाठी एबीपी माझाची टीमही पोहोचली विरारच्या त्याच प्लॅटफॉर्मवर आणि समोर आली एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी थरारक गोष्ट...
विरार : रिक्षाचालकांचे अनेक कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक कारमाना सध्या ट्विटर, फेसबुकवर व्हायरल होत आहे. विरार रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर रिक्षा धावतानाचा हा व्हिडीओ आहे. गर्दीच्या वेळी ज्या प्लॅटफॉर्मवर माणसांनाही चालायला अवघाड पडतं त्यावर रिक्षा दिसल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. ही रिक्षा प्लॅटफॉर्मवर कशी आली? का आली? रिक्षाला परवानगी कोणी दिली अशा अनेक प्रश्नांचा शोध घेण्यासाठी एबीपी माझाची टीमही पोहोचली विरारच्या त्याच प्लॅटफॉर्मवर आणि समोर आली एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी थरारक गोष्ट...
तर ही संपूर्ण घटना रविवार 4 ऑगस्ट 2019 रोजी घडली होती. या दिवशी वसई-विरारमध्ये तुफान पाऊस सुरु होता. पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक सेवा पूर्णत: कोलमडली होती. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यातच नालासोपारा इथे राहणारी मौमिता किर्तीका हलदर या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. तिला उपचारांसाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र तिची प्रसुती करावी लागेल आणि प्रीमॅच्युअर्ड बेबीला अतिदक्षता विभागात ठेवावं लागेल. त्यासाठी वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असं रुग्णालयातील डॉक्टरांनी मौमिताच्या कुटुंबीयांना सांगितलं. यानंतर कुटुंबीयांनी तिला मुंबईच्या सरकारी दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला.
विरार स्टेशनच्या अगदी जवळ हे रुग्णालय असल्याने तसंच रस्त्यावर जागोजागी पाणी साचल्याने घरच्यांनी तिला रेल्वेने मुंबईला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तिला सकाळी आठ वाजता रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला. परंतु चर्चगेट लोकलमध्ये बसल्यावर तिला प्रसुती कळा सुरु झाल्या. मोमितांना आता असह्या वेदना होत होत्या. चालत रुग्णालयापर्यंत जाण्याची तेव्हा ना त्यांची क्षमता होती ना तितका वेळ. तेवढ्यात पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र सावंत आणि रिक्षाचालक सागर गावड हे देवासारखे मदतीला धावून आले.
रामचंद्र सावंत यांनी संजीवनी रुग्णालयाला महिलेला दाखल करुन घेण्याची विनंती केली आणि तिला घेऊन येतो, असं कळवलं. मात्र रुग्णवाहिकेची वाट न बघता, तसंच रेल्वेचे नियम आणि होणाऱ्या कारवाईचा विचार न करता त्यांनी रिक्षा थेट प्लॅटफॉर्मवरच आणली. मौमिताला रिक्षामध्ये बसवून विरारच्या संजीवनी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं. अवघ्या दहा मिनिटातच त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्मही दिला. मात्र ते प्रीमॅच्युअर असल्यामुळे बाळाला दुसऱ्या रुगणालयात अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं.
पण शेवटी कायद्यासमोर सगळेच सारखेच. विरार लोहमार्ग पोलिसांनी रिक्षाचालक सागर गावडवर कायद्यान्वये 154 प्रमाणे आणि 159 प्रमाणे गुन्हा दाखल करुन, त्याला सोमवारी वसई सत्र न्यायालयासमोर हजरही केलं. परंतु न्यायालयाला सर्व हकीकत कळल्यानंतर सागरला केवळ समज दिली. चांगल्या हेतूने हे कृत्य केल्याने त्याच्यावरील सर्व गुन्हे माफ केले.
तेव्हा रिक्षाच्या व्हायरल व्हिडीओमागे लपलीय एक माणुसकीची आणि मुंबईचं स्पिरीट काय आहे ते दाखवणारी सुंदर आणि थरारक घटना...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement