Raj Thackeray : वर्षभरापासून वडापाव पाहिला की राज्य सरकारची आठवण येते, राज ठाकरेंची मिश्किल टीप्पणी
Raj Thackeray : गोरेगावातील वडापाव महोत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला वडापावची उपमा देत मिश्किल टीप्पणी देखील केली.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वडापाव (Vadapav) महोत्सवाच्या कार्यक्रमात राज्य सरकार मिश्किल टीप्पणी केली. हा वडापाव पाहिला की मला राज्य सरकारची आठवण येते, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारला वडापावची उपमा दिली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामधला वडा अजित पवार आहे, की अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वडा हा एकनाथ शिंदे आहे की त्या दोघांमधला वडा देवेंद्र फडणवीस आहेत, हेच कळत नाही. गोरेगावात वडापाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. .या महोत्सवाला अनेक कलाकार मंडळींनी देखील हजेरी लावली होती. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी या मंचावरुन वडापावचं भरभरुन कौतुक देखील केलं.
वडापावचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या दिवंगत अशोक वैद्य यांचं संपूर्ण कुटुंब देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी अशोक वैद्य यांना महाराष्ट्र भूषण जाहीर करावा अशी मागणी देखील यावेळी राज ठाकरेंनी केली. तसेच क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरची देखील वडापाव बद्दलची आठवण यावेळी राज ठाकरेंनी सांगितली. आज हा वडापाव अनेक ठिकाणी पोहचलाय. पण मी आजपर्यंत वाईट वडापाव कुठेही खाल्ला नाही. खरंतर हे अशोकरावांचे आभार की त्यांनी कित्येक पिढ्या घडवल्या आणि गाड्या उभ्या करण्याची संधी दिली, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
वडापाव पाहिला की सरकारची आठवण येते - राज ठाकरे
या वडापाव महोत्सवात राज ठाकरे यांनी वडापावची उपमा थेट राज्य सरकारला दिली. मागील एक वर्षापासून मला वडापाव पाहिला की राज्य सरकारची आठवण येते असं म्हणत राज ठाकरेंनी मिश्किल टीप्पणी केली. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वडा अजित पवार आहे, की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वडा हा एकनाथ शिंदे आहे की त्या दोघांमधला वडा देवेंद्र फडणवीस आहेत, हेच कळत नाही.
हाच वडापाव खाऊन अनेक पिढ्या घडल्यात - राज ठाकरे
मी किर्ती महाविद्यालय, शिवाजी पार्क इथला वडापाव खाऊन मोठा झालोय. अशा अनेक पिढ्या या वडापाव घडवल्या आहेत. त्यामुळे हा वडापाव फार जिव्हाळ्याचा विषय आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं. दरम्यान यावेळी राज ठाकरेंनी सचिनचा अनुभव देखील सांगितला. आचरेकर सर सचिनच्या स्टम्पवर 1 रुपया ठेवयचे आणि सांगायचे हा रुपया पडला नाही तर तो तुझा. त्यावेळी 1 रुपयात वडापाव यायचा. तो वडापाव खाण्यासाठी सचिन दिवसभर तो स्टम्प पडू द्यायचा नाही. वडापाव ही संकल्पना अशोक वैद्य आणली. त्यामुळे अशा माणसांना महाराष्ट्र भूषण द्यायला हवा, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
अशोक वैद्य यांनी सुरु केलेल्या वडापावचं कौतुक लंडनंमध्ये होतं - राज ठाकरे
अशोक वैद्य यांनी सुरु केलेल्या वडापावचं कौतुक लंडनमध्ये होतं आणि इथे आपण मॅकडोनाल्ड्सचं कौतुक करतो. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, या कलाकार मंडळींचं चांगलं असतं. , स्वतः डाएट करतात आणि तुम्हाला वडापाव लंडन मिसळ असे चित्रपट काढून खायला लावतात, असं राज ठाकरे म्हणाले.
लंडनला वडापाव सुरु होण्याची गोष्ट
यावेळी राज ठाकरे यांनी दहा वर्षापूर्वी लंडनमध्ये सुरु झालेल्या एका वडापावची गोष्ट देखील सांगितली. दहा वर्षांपूर्वी दोन मराठी मुलं मला भेटायला आली होती. त्यांनी मला म्हटलं की आम्हाला बाळासाहेबांना भेटायचं होतं त्यांना भेटलो. आता तुम्हाला भेटायला आलो आहोत. संध्याकाळच्या फ्लाईटने आम्हाला लंडनाला जायचं आहे. मी त्यांना विचारलं तिथे जाऊन काय करणार. त्यांनी मला सांगितलं आम्ही तिथे जाऊन वडापाव सुरु करणार आहोत. त्यानंतर मी तिथे भेट दिली. तिथे गोऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होती वडापाव खाण्यासाठी. खरंतर त्यांना तिखट जास्त मानवत नाही, तरीही त्यांना अशोक वैद्य यांनी सुरु केलेला वडापाव आवडला, हे विशेष, असं राज ठाकरेंनी म्हटलं.