सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यास रेल्वे अनुकूल; पण..
सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यास रेल्वे अनुकूल आहे. तर रेल्वेच्या अभिप्रायावर लवकरच चर्चा करून निर्णय घेऊ, असे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे.
मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्यास राज्य सरकारने बनवलेल्या प्रस्तावावर रेल्वेने आज उत्तर दिले. या दिलेल्या उत्तरावर मुख्य सचिवांसोबत चर्चा करून लवकरच रेल्वे सुरू करू, असे मत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. तसेच लोकल सुरू करण्यास रेल्वे प्रशासन उशीर करत नसल्याचे देखील असलम शेख यांनी सांगितले आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सर्व महिलांसाठी लोकल सुरू केल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी देखील ती सुरू व्हावी यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढवत आहे. त्यामुळेच काल वेगवेगळ्या कॅटेगरी बनवून त्यांना वेळ मर्यादा असलेला प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आणि त्यावर रेल्वेचा अभिप्राय मागवला. या प्रस्तावाला आज मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने उत्तर देत काही गोष्टी राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्या.
रेल्वेने राज्य सरकारला दिलेले उत्तर
- वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार गर्दीचे नियंत्रण कसे केले जाईल याबाबत राज्य सरकारने विचार करावा. गर्दी होऊ नये याकरिता पश्चिम बंगाल सरकार प्रमाणे एखादे ॲप विकसित करावे त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी.
- प्रत्येक तासाला लेडीज स्पेशल चालवणे व्यवहार्य ठरणार नाही, त्यामुळे स्टेशन वरील गर्दी वाढेल. सध्या दोन्ही रेल्वे मार्गांवर कोरोना पूर्वीच्या कालाप्रमाणेच लेडीज स्पेशल धावत आहेत.
- सर्व प्रवाशांना लोकल खुली केल्यास तिकिटांसाठी तिकीट घरांसोबत रेल्वेच्या युटीएस ॲप मध्ये देखील बदल करावे लागतील.
- जीआरपी आणि आरपीएफ यांना मदत करण्यासाठी राज्य पोलीस दलाची आम्हाला मदत लागेल.
- या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी लवकरात लवकर एक बैठक आयोजित करावी.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने राज्य सरकारला पाठवलेल्या उत्तरामध्ये कोरोना पूर्वीची आणि आता सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवेतील लोकल सेवेतील प्रवाशांची आकडेवारी देण्यात आली आहे. "तसेच सध्या ज्या 1410 विशेष लोकल चालविण्यात येत आहेत, त्यात वाढ करून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आधी प्रमाणे पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या चालवण्यास आम्ही तयार आहोत असे", पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.
गर्दीचे विभाजन करण्यासाठी उपाय शोधा, लोकल सुरू करण्याबाबत सरकारच्या प्रस्तावाला रेल्वेचं उत्तर
रेल्वेने दिलेल्या या उत्तरावर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही पाठवलेल्या पत्रामध्ये वेगवेगळ्या पॅरामिटर ठरवून गर्दी कमी कशी होईल याचा विचार केलेला आहे, रेल्वेने दिलेल्या उत्तरावर मुख्य सचिवांसोबत आम्ही चर्चा करू, रेल्वेला काही अडचण असल्यास त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर त्यावर मार्ग काढू", असे असलम शेख एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. लोकल सुरू करावी यासाठी रेल्वे उशीर करते आहे का असे विचारल्यावर, "जर रेल्वेने आमच्या प्रस्तावाला उत्तर दिले नसते तर असे म्हणता आले असते, आता सध्या तरी असे वाटत नाही", असेही असलम शेख यांनी स्पष्ट केले.
सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरु व्हावा यासाठी रेल्वे आणि राज्य सरकार नक्कीच प्रयत्न करत आहेत. मात्र, ते करत असताना आधी प्रमाणे उशीर न लावता लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावे अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवासी व्यक्त करत आहेत.
Mumbai Local मधील गर्दी टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा, सरकारच्या प्रस्तावाला रेल्वेचं उत्तर