(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेसच्या 4 आमदारांसह राधाकृष्ण विखे-पाटील जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये जाणार : सूत्र
मराठवाड्यातून एक आमदार, पश्चिम महाराष्ट्रातून एक आमदार, मुंबईतून एक आमदार असे चार आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खचलेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांसह जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
मराठवाड्यातून एक आमदार, पश्चिम महाराष्ट्रातून एक आमदार, मुंबईतून एक आमदार असे चार आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत आहेत. विखे पाटील जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपात प्रवेश करतील, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. कालिदास कोळबंकर, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार हे आमदार विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. आणखी दोन आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत.
राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशासाठी दिल्लीतील भाजपाचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1 ते 6 जूनच्या दरम्यान हा प्रवेश सोहळा होईल आणि त्याचीच गुप्त मीटिंग राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्याची माहिती आहे.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपात जाण्याचे संकेत दिले होते. राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून लवकरच मंत्रीपद दिले जाणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. तसेच राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याची भूमिकाही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांना लवकरच मंत्रिपद मिळणार, काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट | ABP Majha