नालासोपाऱ्यातील रेलरोको आंदोलन मागे, चार तासांच्या खोळंब्यानंतर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरू
रेल्वे ट्रॅकवर नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. काही रेल्वे गाड्या नालासोपारा स्टेशन परिसरातच थांबल्या आहेत.

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात नागरिकांनी रेलरोको केला होता. सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा रेलरोको सुरु होता. अखेर पोलिसांना बळाचा वापर करुन रेलरोको थांबवला. त्यामुळे चार तासांनतर नालासोपाऱ्याहून विरारकडे जाणारी लोकल सेवा सुरु झाली आहे.
ऐन गर्दीच्या वेळी रेलरोको करण्यात आल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. नागरिकांनी रेलरोकोला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नालासोपारा परिसरातील दुकाने, रिक्षा, वसई विरार पालिकेची बस सेवा, एसटी सेवाही बंद ठेवण्यात आली.
रेल्वे ट्रॅकवर नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. काही रेल्वे गाड्या नालासोपारा स्टेशन परिसरातच थांबल्या आहेत.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात नागरिकांनी रेलरोको, नालासोपाऱ्याहून विरारकडे जाणारी लोकल सेवा ठप्प pic.twitter.com/62499AHdSM
— ABP माझा (@abpmajhatv) February 16, 2019
पुलवामा हल्ल्यात सीआरपीएचे 37 जवान शहीद
गुरुवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
‘जैश’चा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. आदिल हा काकापोरा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता. आदिलच्या गाडीने जवानांच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे मोठा स्फोट झाला.























