(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prakash Ambedkar : आरक्षण टिकवायचं असेल तर ... निवडणुकीआधी प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना दिला इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आरक्षण वाचवायचे असेल तर एकमेव मार्ग म्हणजे वंचित बहुजन आघाडीला निवडून आणणे.
मुंबई : राजकीय पक्ष आरक्षण काढायला निघाले आहेत. आरक्षण वाचवायचे असेल तर एकमेव मार्ग म्हणजे वंचित बहुजन आघाडीला निवडून आणणे. ओबीसींचेही आरक्षण राहील, एससी एसटी यांचेही आरक्षण राहील. क्रीमीलेयर सुद्धा जाईल हे लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचा साथ द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
सुप्रीम कोर्टाने आरक्षण आणि वर्गीकरण्याचा जो निर्णय दिला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती गठीत केली. ज्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि बार्टीचे एक अधिकारी आहेत. त्यांचा अहवाल आला की, क्रीमीलेयर आणि आरक्षण वर्गीकरण या दोन्ही गोष्टी लागू होतील, असा सावधानतेचा इशारा देखील आंबेडकर यांनी दिला आहे. हा निर्णय जरी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतला असला, तरी त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार) आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी पाठिंबा दिला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने म्हटले होते की, फुले शाहू आंबेडकरी मतदाराला हे फसवत आहे. हा त्याचा नमुना आहे जो जीआर निघाल्यानंतर दर दहा मिनिटाला, पाच मिनिटाला कार्यकर्ते, अधिकारी आणि संघटनांचे फोनवर फोन चालू आहेत आणि आता काय केले पाहिजे हे विचारत आहेत. मी त्या सर्वांना सांगतोय की, यावर एक आणि एकमेव. उपाय म्हणजे स्वतंत्र विचारांचे आमदार निवडून आणणे त्यासाठी वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा मार्ग नाही.
उद्याचे सरकार हे एका पक्षाचे राहणार नाही ते अनेक पक्षांचे राहणार आहे. त्या सरकारमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमदार निवडून आले तर एससी, एसटीचा आणि ओबीसींचा क्रीमीलेयरचा मुद्दा आहे. हा विधानसभेत मांडण्यात येईल आणि ज्यांना कोणाला सरकार करायचं आहे त्यांच्यासमोर आपण अट ठेवणार आहोत की, विधानसभा सुप्रीम कोर्टाचा हा निकाल मान्य करत नाही. म्हणून ही विधानसभा राष्ट्रपतींना विनंती अशी करते की, वर्गीकरण आणि क्रीमीलेयर हे सुप्रीम कोर्ट लावू शकते का संसद लावू शकते या संदर्भातील निकाल सुद्धा त्यांनी दिला पाहिजे. याच्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हे राजकीय पक्ष आरक्षण काढायला निघाले आहेत. आरक्षण वाचवायचे असेल तर एकमेव मार्ग म्हणजे वंचित बहुजन आघाडीला निवडून आणणे. ओबीसींचेही आरक्षण राहील, एससी एसटी यांचेही आरक्षण राहील. क्रीमीलेयर सुद्धा जाईल हे आपण लक्षात घ्या. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो असच आपण म्हटले पाहिजे, असे आवाहन आंबेडकर यांनी आरक्षणवादी मतदारांना केले आहे.