संजय राठोड प्रकरणी चित्रा वाघ यांची हायकोर्टात याचिका, गंभीर आरोप असतानाही आमदारांवर गुन्हा का दाखल नाही? याचिकेत सवाल
सदर तरूणीचे शिवसेना नेते आणि राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी नावं जोडलं गेलं. तिच्या राठोड यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणाच्या 11 ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर पसरवण्यात आल्या होत्या.

मुंबई : पुण्यात फेब्रुवारी महिन्यात इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून झालेल्या एका तरूणीच्या मृत्यूप्रकरणी राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात एफआयआर दाखल करा, अशी मागणी करत याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल कऱण्यात आली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकराला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
मात्र या प्रकरणात 'त्या' तरूणीच्या कुटुंबियांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. मग याचिकाकर्ते कोणत्या उद्देशाने तक्रार दाखल करा असे सांगत आहेत?, असा सवाल यावेळी राज्य सरकारच्यावतीने उपस्थित करण्यात आला. तेव्हा, दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत हायकोर्टानं राज्य सरकारला याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.
सोशल मीडिया स्टार असलेल्या पुण्यातील एका तरूणीचा 8 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. मात्र त्यानंतर समोर आलेल्या माहितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील एकूणच वातावरण ढवळून निघालं होतं. राज्यातील राजकारणात एकच गदारोळ निर्माण झाला. त्यातच सदर तरूणीचे शिवसेना नेते आणि राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी नावं जोडलं गेलं. तिच्या राठोड यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणाच्या 11 ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर पसरवण्यात आल्या होत्या.
संजय राठोड यांच्याविरोधात असे गंभीर स्वरुपाचे आरोप झालेले असतानाही राठोड यांच्याविरोधात अद्याप गुन्हा का दाखल करण्यात आलेला नाही? असा सवाल करत याचिका भाजपच्या चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती सुनिल देशमुख आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.























