(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत खासगी कामाच्या ठिकाणी आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये लसीकरणास परवानगी, बीएमसीकडून मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गृहनिर्माण संस्था आणि खासगी कंपनी आता मुंबईतील खाजगी लसीकरण केंद्राशी करार करू शकतील. त्यासाठी पालिकेने अधिकृत मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहेत.
मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढीबरोबरचं लसीकरण मोहिमही वेगाने राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खासगी कामाच्या ठिकाणी आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सध्या मुंबईतील खासगी रुग्णालय, सरकारी रुग्णालय, आणि पालिकेने सुरु केलेल्या लसीकरण केंद्रांमध्येच नागरिकांना लस दिली जात आहे. परंतु आता मुंबईतील खासगी सोसायट्या आणि खाजगी कंपन्यांमध्येही लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेने लसीचा साठा विचारात घेऊन खासगी रुग्णालयांना सोसायट्यांचा आवारात लसीकरण मोहिम सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शन सूचना लसीकरणादरम्यान प्रत्येक रुग्णालायांना पाळणे बंधनकारक असणार आहे.
लसीकरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गृहनिर्माण संस्था आणि खासगी कंपनी आता मुंबईतील खाजगी लसीकरण केंद्राशी करार करू शकतील. त्यासाठी पालिकेने अधिकृत मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांना स्वत: लस खरेदी कराव्या लागतील. त्यानतंर लसीकरण शिबीर घ्यावे लागेल.
कामाच्या ठिकाणी लसीकरण शिबीर भरवता येतील. मुंबईतील खाजगी लसीकरण केंद्रे आणि गृहनिर्माण संस्था / कंपनी या दोघांना संयुक्तपणे डोसची किंमत ठरवावी लागेल. या खाजगी कंपन्या / गृहनिर्माण संस्था आणि खाजगी रुग्णालयात समन्वय साधणाऱ्या एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. हे नोडल अधिकारी कार्यालयांमधील किंवा गृहनिर्माण संस्थांमधील लसीकरणाच्या सर्व बाबींवर देखरेख व सुलभता राखण्यासाठी लाभार्थ्यांची नोंदणी, साठा, यावेळी लागणाऱ्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करेल.
लसीकरणापूर्वी लाभार्थ्यांना Co-WIN portal वर नोंदणी करणे बंधनकारक असेल. दरम्यान हे नोडल अधिकारी सर्व नागरिकांची ऑनलाईन नोंदणी सुनिश्चित करतील. खाजगी कार्य़ालयांबाबत थेट लसीकरण केंद्रांवरही नोंदणी करता येईल मात्र, केवळ कामाच्या ठिकाणी असलेल्या कर्मचार्यांना अशी थेट नोंदणी उपलब्ध असेल. या व्यतिरीक्त खाजगी कार्य़ालयातील कर्मचार्यांच्या कुटूंबातील सदस्यांना लसीकरण करायचे असल्यास Co-WIN portal वर नोंदणी असणे आवश्यक आहे.
एका खासगी लसीकरण केंद्रामार्फत शहरातील इतर कार्यालये किंवा गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही लसीकरण कार्यक्रम घेतला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या खासगी लसीकरण केंद्रांना जोडलेली कार्यालये आणि गृहनिर्माण संस्थेची माहिती स्थानिक आरोग्य प्राधिकरण (संबंधित प्रभाग एमओएच) आणि ईपीआय यांना दिली जाईल. या शिबिरांतील लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची जबाबदारी गृहनिर्माण संस्था आणि कंपनीची असेल. ज्या ठिकाणी लसीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाईल त्या ठिकाणी लसीकरणासाठीच्या अत्यावश्यक सुविधा असणं गरजेचं आहे.
खासगी लसीकरण केंद्रात खालील नमूद केलेल्या चार अर्हता असल्यास अशा खासगी लसीकरण केंद्रांनी आपले अर्ज नोंदणीसाठी आपल्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात देणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर खासगी लसीकरण केंद्राची नोंदणी कोविन पोर्टलवर करणे सुलभ होईल.
1. प्रत्येक लसीकरण केंद्रात लस साठवणुकीसाठी पुरेशी शीतसाखळी उपकरणे असणे आवश्यक आहे.
2. लसीकरण केंद्रात लाभार्थ्यांसाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.
3. लसीकरणासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे.
4. लसीकरणामुळे प्रतिकूल घटना घडल्यास त्यावर योग्य उपचारांची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
जर लसीकरणाचा हा प्रयोग यशस्वी झाला तर अशाप्रकारे आणखी डोर-टू-डोर लसीकरण अभियान सुरू करण्याचा विचार केला जाईल