आता डोळ्यांना न दिसणाऱ्या शत्रू संगे आपलं युद्ध सुरु झालंय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायबर पोलीस ठाण्यांचे उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई : दिवसेंदिवस गुन्ह्यांचं स्वरुप बदलताना दिसत आहे. कोरोनाप्रमाणे गुन्हेगारी हा देखील एक प्रकारचा व्हायरसचं आहे. सायबर क्राईम डोळ्यांना दिसत नाही. अशा या न दिसणाऱ्या शत्रू संगे आपले युद्ध आता सुरु झाले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याचे प्रत्यक्षात उद्घाटन केले तर पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आणि मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. याच कार्यक्रमात 94 पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षाचे ऑनलाईन उद्घाटनही करण्यात आले आहे.
डोळ्यात तेल घालून काम करणे म्हणजे काय असते याची प्रचिती पोलिसांकडे पाहिल्यानंतर येते. पोलिसांच्या हातात घड्याळ असते मात्र त्यांना काम करताना वेळेचं भान राहत नाही. गुन्ह्यांचे स्वरूप बदलते आहे. मोबाईल फोनचा दुरुपयोग वाढतो आहे, आपल्याच साधनांचा उपयोग करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत होत आहे. जगाच्या पाठीवरचा कुणीही कुठेही बसून आपल्या घरातील माहिती, पैसे आणि इतर गोष्टींची चोरी या माध्यमातून करू शकतो, असे असले तरी या गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल, याबद्दल मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पोलिसांच्या घराचा प्रश्न मार्गी लावणार : मुख्यमंत्री तुमची कुणी बदनामी केली तरी बेचैन होऊ नका, त्यांचा बुरखा तुम्ही फाडला आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, तुमचा अभिमान राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे. सरकार म्हणून ताकतीने तुमच्या मागे उभे आहे. पोलिसांच्या घराचा प्रश्न आपण संपूर्णत: मार्गी लावणार आहोत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे, यासाठीचे आवश्यक असणारे प्रस्ताव समोर आणा आपण त्याला मंजूरी देऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गुन्हेगार आणि गुन्हेगारीवर जरब बसवायची असेल तर नागरिकांना पोलिसांची भीती वाटू नये. दरारा आणि दहशत यामध्ये फरक आहे. गुंडाची असते ती दहशत आणि पोलिसांचा असतो तो दरारा. नागरिक आणि पोलिसांमधील अंतर कमी करण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.