I.N.D.I.A Alliance : इंडिया आघाडीच्या संयोजक पदी नितीश कुमारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? उद्धव ठाकरेंची महत्त्वाच्या नेत्यांसोबत फोनवरुन चर्चा
I.N.D.I.A Alliance : इंडिया आघाडीच्या संयोजक पदी नितीश कुमार यांच्या नावावर पुढील बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मुंबई : इंडिया आघाडीमध्ये (I.N.D.I.A Alliance) सध्या संयोजक पदी नितीश कुमार (Nitish Kumar) यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. तसेच इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीमध्ये नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं देखील म्हटलं जातंय. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती समोर आलीये.
उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीआधी नितेश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, केसी वेणू गोपाल यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. त्यामुळे इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीमध्ये संजयोक म्हणून नितीश कुमार यांच नाव पुढे येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जेडीयुचे महासचिव कपिल पटील यांनी एबीपी माझासोबत संवाद साधताना यासंदर्भात माहिती दिली.
इंडिया आघाडीसाठी नितीश कुमार यांचा पुढाकार - कपिल पाटील
इंडिया आघाडीच्या स्थापनेसाठी नितीश कुमार यांनीच पुढाकार घेतला होती, त्यांनीच ही आघाडी बनवली असल्याची प्रतिक्रिया जडीयुचे महासचिव कपिल पाटील यांनी दिली. पुढे त्यांनी म्हटलं की, जर त्यांना अधिकची जबाबदारी मिळेल तर कार्यकर्ता म्हणून मला आनंद आहे. मला कुठल्याही पदाची लालसा नाही, असं नितीश कुमारांनी वांरवार सांगितलं आहे. संयोजक पद कोणाला मिळणार यामध्ये त्यांना फारसा रस नाही. पण आघाडी मजबूत व्हावी, जागावाटपावर चर्चा व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
उद्धव ठाकरे पुढाकार घेऊन प्रयत्न करतायत
उद्धव ठाकरे हे स्वतः पुढाकार घेऊन यामध्ये आघाडीसाठी प्रयत्न करतायत. उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार यांच्याशी चर्चा फोनवर केली. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी देखील फोनवरुन चर्चा केली. त्याचप्रमाणे त्यांनी केसी वेणुगोपाल यांच्याशी देखील चर्चा केली. पण आता त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे मला आता सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी दिली.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी सगळेजण प्रयत्नशील
राज्यातील महाविकास आघाडीचे नेते नितीश कुमार यांच्या बद्दल आदर राखून आहेत. त्यामुळे नितीश कुमार यांच्या संयोजक पदाच्या नावाबद्दल त्यांना काही अडचण असेल असं मला वाटत नाही. इंडिया आघाडीची लवकरच बैठक व्हावी यासाठी राज्यातील सर्व नेते प्रयत्नशील आहेत. नितीश कुमार संयोजक झाले की त्याचा मोठा आनंद होईल. त्यातून जर राज्यात काही मिळालं तर कोणाला नको असेल. आम्ही उद्धव ठाकरेंना कुटुंबप्रमुख मानलं आहे, ते या संबंधी योग्य तो निर्णय घेतील, असं कपिल पाटील यांनी म्हटलं.
हेही वाचा :
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेची घोषणा, राज्य सरकारचा नेमका निर्णय काय?