समीर वानखेडेंसाठी काशिफ खान करतो वसूली; नवाब मलिक यांचा आरोप
Nawab Malik on Sameer Wankhede : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Mumbai Drugs Case: मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांची मालिका संपण्याची चिन्ह नाहीत. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करून समीर वानखेडेंवर प्रश्न उभे केले आहेत. के.पी. गोसावी आणि दिल्लीतील एका खबरी दरम्यानचे चॅट समोर आणले असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. काही खास व्यक्तिंनाच छापा मारताना ताब्यात घेतले आणि खास लोकांना सोडून देण्यात आले असल्याचा दावा मलिक यांनी केला.
गोसावी आणि भानुशाली यांना घेरले
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केपी गोसावी आणि मनीष भानुशाली हे क्रूझ पार्टी प्रकरणातील मुख्य पात्र आहेत. काशिफ खान हेही या बाबतीत महत्त्वाचे नाव आहे. काशिफ खानही मुंबईतील क्रूझ पार्टीत होता आणि दुबईतील एक व्यक्तीही त्याच्यासोबत होती. ती व्यक्ती व्हाईट दुबई म्हणून ओळखली जाते. येत्या काही दिवसात या व्हाईट दुबईचा खुलासा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काशिफ खानला ताब्यात का घेतले नाही?
काशिफ खान आणि व्हाईट दुबई नावाच्या व्यक्तीला समीर वानखेडे यांनी ताब्यात घेतले नसल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. काशिफ खान आणि समीर वानखेडे यांचा संबंध काय? याचा खुलासा वानखेडे यांनी करावा अशी मागणी मलिक यांनी केली. काशिफ खान हा समीर वानखेडेसाठी पैसे उकळण्याचे काम करतो, असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला. गोव्यात ड्रग्जचे मोठे रॅकेट चालवले जाते. काही दिवसांपूर्वी काशिफ खानवर मुंबईतील वांद्रे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सध्या तो गोव्यातच असल्याचा दावाही मलिक यांनी केला.
पाहा व्हिडिओ: काशिफ खानला आणि 'व्हाईट दुबई'ला समीर वानखेडे यांनी वाचवलं का? : नवाब मलिक