'माझ्या मुलांनी मित्र गमावले आणि मला ड्रग पेडलरची बायको म्हणून हिणवलं गेलं....'; नवाब मलिकांच्या मुलीने व्यक्त केली खंत
राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची मुलगी निलोफर मलिक खान (Nilofer Malik Khan) यांनी सोशल मीडियावर एक खुलं पत्र लिहिलं आहे. त्या माध्यमातून त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज खटला आणि त्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. एनसीबी केंद्राच्या आदेशावर काम करत असून महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्याचं काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केलेत. आता नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक खान यांनी आपल्या भावना एका खुल्या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. एनसीबीच्या खोट्या आरोपामुळे माझ्या मुलांनी मित्र गमावले तर मल ड्रग्ज पेडलरची बायको म्हणून हिणवलं असं त्या म्हणाल्या.
निलोफर मलिक खान यांनी त्यांचे पती समीर खानच्या अटकेनंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर From the wife of an Innocent: The Beginning या शिर्षकाने खुले पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात की, 'आपल्या आयुष्यात अशी काही अनपेक्षित संकटं येतात की ज्यामुळे आपण मुळासकट हादरुन जातो. आम्ही विचारही करु शकणार नाही असंच एक संकट आमच्यावर आलं होतं. त्यामध्ये आमची काहीच चूक नसताना आम्हाला रोज त्याला सामोरं जावं लागतंय. माझ्या पतीला 12 जानेवारीला एनसीबीचे समन्स आलं आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं."
An Open Letter From The Wife Of An Innocent: THE BEGINNING#OpenLetter #SameeeKhan #NiloferMalikKhan #SameerWankhede #JusticeForSameer #WeWontBackDown #justiceoverinjustice #nawabmaliksameer pic.twitter.com/CEyVwSGiyd
— Nilofer Malik Khan (@nilofermk) November 6, 2021
निलोफर मलिक खान पुढे म्हणतात की, "एनसीबीकडे कोणतेही पुरावे नसताना समीर यांना अटक करण्यात आली. या गोष्टीमागे मोठं राजकारण असल्याचं समजलं तेव्हा आम्हाला धक्काच बसला. दुसऱ्या दिवशी आमच्या घरी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. त्यामध्ये काहीही सापडलं नाही. समीर यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसतानाही त्यांना अनेक महिने तुरुंगात काढावी लागली. माध्यमांमध्येही याबद्दल चुकीच्या बातम्या छापून येत होत्या, आम्हाला गुन्हेगार ठरवण्यात आलं. समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला."
माझ्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी हा कसोटीचा काळ होता. माझ्या मुलांनी त्यांचे मित्र गमावले. मला ड्रग पेडलरची बायको म्हणून हिणवलं गेलं असं निलोफर मलिक खान यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :