(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navneet Rana Case : राणा दाम्पत्याची जामिनासाठी धावाधाव; आज सत्र न्यायालयात अर्ज करणार
Navneet Rana And Ravi Rana News Updates : राजद्रोह प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी राणा दाम्पत्याचा खटाटोप, आज सत्र न्यायालयात अर्ज करणार, पोलीस छळ करत असल्याचा आरोप करत लोकसभाध्यक्षांना पत्र
Navneet Rana And Ravi Rana News Updates : राजद्रोहाच्या प्रकरणात जामीनासाठी राणा दांपत्यानं आता मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. आज दंडाधिकारी कोर्टातील प्रलंबित जामीनाची याचिका मागे घेणार आहे. तर पोलिसांसोबत हुज्जत घातल्याच्या प्रकरणात एफआयआर रद्द करण्याची याचिका राणा दाम्पत्यानं हायकोर्टात केली होती. हायकोर्टानं नवनीत राणा आणि रवी राणा यांची ही याचिका फेटाळली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, राणा दाम्पत्यानं पोलिसांना विरोध करणं गैर असल्याची टिप्पणी हायकोर्टानं केली आहे. अशातच आज होणाऱ्या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालय राणा दाम्पत्याला दिलासा देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्यानं अटक झालेले आणि आता न्यायालयीन कोठडीत असलेलं राणा दाम्पत्याचे राजद्रोहाच्या प्रकरणात जामीनासाठी प्रयत्न सुरु आहेत. राणा दांपत्य याच प्रकरणात आज अगोदर दंडाधिकारी कोर्टातील प्रलंबित जामीनाची याचिका मागे घेणार आहे. त्यानंतर तातडीनं सकाळच्या सत्रातच जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणीसाठी प्रयत्न करणार आहेत. राजद्रोहाच्या आरोपात जामीन देण्याचे अधिकार दंडाधिकारी कोर्टाला नाहीत. त्यामुळे तिथला वेळ वाचवण्यासाठी दंडाधिकारी कोर्टातील याचिका मागे घेत थेट सत्र न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय राणा दांपत्यानं घेतला आहे.
नेमकं प्रकरण काय?
नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. दोन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :