मराठा आरक्षणावर दोन दिवसात सरकारकडून हालचाली होतील- नारायण राणे
मराठा आंदोलनाच्या चिघळलेल्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मराठा आंदोलन आणि आरक्षणावर चर्चा झाली.
मुंबई : मराठा आंदोलनाच्या चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मराठा आंदोलन आणि आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली. पुढच्या दोन दिवसांत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर सरकारकडून योग्य हालचाली होतील असं राणेंनी सांगितलं आहे.
"आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजामध्ये असंतोष आहे आणि त्याचा उद्रेक झाला आहे. आंदोलन अधिक चिघळू नये यासाठी याप्रकरणात हस्तक्षेप करण्यात यावा. मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करुन याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा", असं आवाहन नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.
"मराठा समाजाला अरक्षणापासून फार काळ दूर ठेवता येणार नाही. आरक्षण लवकरात लवकर कसं देता येईल याचा विचार सरकारने करावा", असंही राणे यावेळी म्हणाले. मात्र आपल्या मागण्यासाठी मराठा समाजाने लोकशाही मार्गाने आंदोलन करावे आणि न्याय मिळवून घ्यावा, असंही राणेंनी यावेळी सांगितले.
"कोण चूक, कोण बरोबर हे सांगण्याची ही वेळ नाही. मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करू नका", असा सल्लाही राणेंनी यावेळी दिला. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात कोर्टात प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात योग्य हालचाली होतील आणि यावर पडदा पडेल, असही राणेंनी सांगितलं.
मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रश्न विचारल्यावर मात्र नारायण राणेंनी बोलण्यास नकार दिला.
संबधित बातम्या