मुंबईकरांनो काळजी घ्या, डेंग्यू,मलेरियाचे रुग्ण वाढले ; सप्टेंबर महिन्यात 1261 रुग्णांची नोंद
काही रुग्णांमध्ये हीच लक्षणे असली तरी वैद्यकीय चाचणीमध्ये कोणत्याही आजाराचे निदान होत नसल्याने नागरिक कमालीचे अस्वस्थ होत आहेत.
मुंबई : वाढत्या मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकर आजारी पडत असल्याचे चित्र शहरातील रुग्णालये पाहिल्यानंतर लक्षात येते. पावसाळ्यातील शेवटच्या महिन्यात मुंबईत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यातच, सप्टेंबर महिन्यात मलेरीया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत वाढल्याचं दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईत मलेरियाच्या 1261 केसेसची नोंद तर डेंग्यूच्या 1456 केसेसची नोंद करण्यात आलीय. पावसाचा जोर ओसरला तरी पावसाळी आजारांची संख्या काही कमी झालेली नाही. शहरात मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. हे दोन्ही आजार डासांमुळे होतात. त्यामुळे, घर व परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करणे आणि डासांचा प्रादुर्भाव कमी होईल, यासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेकडून भाग मच्छर भाग ही विशेष जनजागृती मोहिम देखील राबवली जात आहे.
डेंग्यू आणि मलेरिया या आजारांमध्ये थंडीताप, सर्दी, खोकला आणि सांधेदुखी ही सर्वसामान्य लक्षणे दिसतात. मात्र काही रुग्णांमध्ये हीच लक्षणे असली तरी वैद्यकीय चाचणीमध्ये कोणत्याही आजाराचे निदान होत नसल्याने नागरिक कमालीचे अस्वस्थ होत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार व्हायरल (विषाणूंचा) संसर्ग असल्याचे सांगितले जात आहे. अंगदुखीमुळे बेजार काही रुग्णांमध्ये थंडी, ताप, खोकला, सर्दी अशी सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र, दोन ते तीन दिवसांनी रक्तचाचणी केल्यानंतर कुठल्याही आजाराचे निदान होत नाही. डॉक्टर व्हायरलची साथ असल्याचे सांगून लक्षणानुसार उपचार करत आहेत. विशेष म्हणजे, तीन-चार दिवसांत हा आजार बरा होत असला तरी अंगदुखीमुळे मात्र बाधित रुग्ण हैराण होत असल्याचे चित्र आहे.
काय काळजी घ्यावी
नागरिकांनी आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला, इमारतीच्या परिसरात कुठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते. डासांची उत्पत्तीस्थळे तयार होतात. साचलेले पाणी आढळल्यास त्याचा तत्काळ निचरा करावा. टायर, नारळाच्या करवंट्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या व आकण, झाडांच्या कुंड्या, फ्रीजचा डिफ्रॉस्ट दे यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. फेंगशुई, मनी प्लांटसारख्या शोभेच्या रोपट्यांचे पाणी नियमित दिवसा-रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करावा.
झिका व्हायरसचा एक रुग्ण आढळला
मुंबई झिका व्हायरसच्या एका रुग्णाची नोंद झाली असून 63 वर्षीय महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाची तब्येत स्थिर असून आता कोणतीही लक्षणे नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. तसेच, झिका आजारामुळे मृत्यूचे प्रमाण नगण्य असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचं देखील पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. झिकामध्ये ताप येणे, पुरळ, डोळे दुखणे, अंग दुखी, सांधे दुखी, थकवा आणि डोकेदुखी सारखी लक्षणे आढळून येतात.
हेही वाचा
''एकनाथ शिंदेंना पुढं करुन कुठल्यातरी चाणक्याने जरांगे पाटलांचा बळी घेतलाय''
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )