एक्स्प्लोर
83 वर्ष जुन्या वरळी सी फेसवर हातोडा पडणार!
सध्या 2 किमी लांबीचा असलेला सीफेस नव्या स्वरुपात 4 किमीचा होणार आहे. विशेष म्हणजे कोस्टल रोड आणि वरळी सी फेसला जोडणारा रस्ता हा हरित पट्टा असेल.

मुंबई : मुंबईतील 83 वर्ष जुन्या वरळी सी फेसवर हातोडा पडणार आहे. शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडच्या कामासाठी लवकरच मुंबई महापालिका वरळी सीफेसचा पट्टा ताब्यात घेणार आहे. टप्प्याटप्प्याने वरळी सी फेस आणि कोस्टल रोडला जोडणारा रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन टप्प्याटप्प्याने काम करणार आहे. परिणामी वरळी सी फेसची रचना काहीशी बदलणार आहे. परंतु संपूर्ण सी फेस बंद केला जाणार नाहीत. सध्या 2 किमी लांबीचा असलेला सीफेस नव्या स्वरुपात 4 किमीचा होणार आहे. विशेष म्हणजे कोस्टल रोड आणि वरळी सी फेसला जोडणारा रस्ता हा हरित पट्टा असेल. या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी बोगद्यांचीही योजना असेल. सध्या वरळी सी फेसच्या बाजूलाच कोस्टल रोडसाठी समुद्रात भरावाचं काम सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन, भाजपचा बहिष्कार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 16 डिसेंबर रोजी कोस्टल रोडचं भूमिपूजन करण्यात आलं. ब्रीच कॅन्डी येथील अमरसन्स गार्डन येथे कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे भाजपच्या इतर नेत्यांनीदेखील या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याचे उद्धव ठाकरे याना आमंत्रण दिले नसल्याने शिवसेनेने कोस्टल रोडच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामधून भाजपला डावलून त्याची परतफेड केली आहे. कोस्टल रोड हे माझे स्वप्न नसून प्रत्येक मुंबईकरांचे स्वप्न आहे. याचे संपूर्ण श्रेय मुंबईकरांना जाते. या प्रकल्पासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे आभार. तसेच या प्रकल्पामुळे कोळी बांधवांचे नुकसान होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. असा असेल 'कोस्टल रोड' प्रकल्प! - प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत 9.98 किलोमीटर कोस्टल रोड असणार आहे. - पुढील 4 वर्षांत हा कोस्टल रोड पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. प्रकल्पाचं बांधकाम तीन भागांत विभागण्यात आलं असून काम स्वतंत्रपणे एकाच वेळी केलं जाणार आहे. - महापालिकेमार्फत होणाऱ्या कामाचे कंत्राट लार्सन अँड टुब्रो, एचसीसी आणि एचडीसी या कंपनींना मिळणार आहे. - आठ हजार कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या या प्रकल्पाचा खर्च विविध करांमुळे तब्बल 12 हजार कोटींवर पोहचला आहे. - या प्रकल्पाचा पहिला भाग प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस, दुसरा भाग हा बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी बाजूपर्यंत,तर तिसरा भाग प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्क असा असणार आहे. - प्रकल्प सल्लागारांनी बनवलेल्या आराखड्यानुसार प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी उद्यान (पॅकेज 4), प्रियदर्शनी उद्यान ते बडोदा पॅलेस (पॅकेज 1), बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक (पॅकेज 2) अशा तीन भागांमध्ये विभागून या कोस्टल रोडचं काम हाती घेण्यात येत आहे. पॅकेज 4 आणि पॅकेज 1 साठी लार्सन अँड टुब्रोला (एल अँड टी) कंपनी पात्र ठरली आहे. तर पॅकेज 2 साठी एचसीसी आणि एचडीसी ही कंपनी पात्र ठरली आहे. संबधित बातम्या उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोस्टल रोडचे भूमिपूजन, भाजपचा बहिष्कार
आणखी वाचा























