42 वर्षीय महिलेवरील बलात्काराच्या आरोपांप्रकरणी 20 वर्षीय तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर
लग्नाचं अमिष दाखवून 42 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपांप्रकरणी 20 वर्षीय तरुणाला मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. 'एका अनुभवी महिलेने स्वत:च्या स्वार्थासाठी तरुणाचा वापर केला', असं निरीक्षण कोर्टाने जामीन मंजूर करताना नोंदवलं.

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने एका 20 वर्षीय तरुणाला 42 वर्षीय महिलेचा बलात्कार केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हा अटकपूर्व जामीन मंजूर करताना एक 42 वर्षीय महिला जी 16 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटित असून तिला 14 वर्षांचा मुलगा आहे, तिला या तरुणाने फूस लावत, लग्नाचं अमिष देऊन तिच्यावर बलात्कार केला हे पटण्यासारखं नाही, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. तसंच याप्रकरणी उलट 'एका अनुभवी महिलेने स्वत:च्या स्वार्थासाठी तरुणाचा वापर केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय', असं मत व्यक्त केलं आहे.
काय आहे प्रकरण?
मुलुंडमधील रहिवासी असलेल्या या मुलाचे साकीनाका परिसरात राहणाऱ्या एका 42 वर्षीय मुस्लीम महिलेसोबत प्रेमसंबंध होते. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार साल 2004 मध्ये या महिलेचा पहिल्या पतीसोबत तलाक झाला आहे. त्यानंतर सप्टेंबर 2018 पासून तिचे या मुलासोबत संबंध होते. मात्र या मुलाने लग्नाचं वचन देत आपला वारंवार बलात्कार केला असून आपल्याकडून 50 ग्राम सोनं आणि लोनवर एक दुचाकीही घेतल्याचा आरोप केला आहे. या महिलेचा दावा आहे की, "या मुलाने तिच्या घरी एक काझी बोलावून तिच्याशी निकाह केला आहे. तसेच आपलं खोट आधारकार्ड दाखवून आपण 26 वर्षाचं असल्याचं सांगितलं होतं. लग्नाच्या काही दिवसांतच अचानक हे लग्न माझ्या घरच्यांना मान्य होणार नाही, असं सांगत आपल्याला पुन्हा आपल्या पहिल्या नवऱ्याकडे सोडून गेला. त्यामुळे ही तक्रार दाखल केल्याचा दावा केला आहे."
मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर करताना कोर्टाचं निरीक्षण
मुळात 16 वर्ष संसार केलेल्या 42 वर्षीय महिलेला लग्नाचं अमिष देऊन बलात्कार केला ही गोष्टच सहज पटण्यासारखी नाही. उलट याप्रकरणात एका अनुभवी महिलेने स्वत:च्या स्वार्थासाठी एका तरुणाचा वापर केल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. हा तरुण जैन असल्याने तो लग्न करण्यासाठी घरी पंडित ऐवजी 'काझी' का बोलावेल?, असा प्रश्न आहे.
मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवताना आरोपीच्या वयाची कोणतीही खातरजमा केली नाही. मुळात त्याचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तपासायला हवा होता. मात्र पोलीस केवळ तक्रारदार महिलेच्या जबानीवर विसंबून राहिले. तसेच तक्रारदार महिलेच्या सुदैवाने तिने जेव्हा ही तक्रार दिली त्याच्या महिनाभर आधीच या आरोपीने वयाची 18 वर्ष पूर्ण केली होती. नाहीतर या महिलेविरोधातच एका अल्पवयीन मुलासोबत शारिरीक संबंध ठेवल्याबद्दल 'पॉक्सो' अंतर्गत कारवाई झाली असती, असंही कोर्टाने आपल्या आदेशात नमूद करत या तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
