मुंबईवरचा निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला; पोस्ट लॅन्डफॉलचे परिणाम दिसणार
आज रात्रभरात हे परिणाम संपूर्णत: संपतील. दरम्यान वाऱ्याचा वेग 90 ते 100 किमी प्रतितास एवढा असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मुंबई : मुंबईवरचा निसर्ग वादळाचा धोक कमी झाला आहे. चक्रीवादळाची धोक्याची तीव्रता कमी झाली आहे. आता केवळ चक्रीवादळ येऊन गेल्यानंतरचे पोस्ट लॅन्डफॉल परिणाम दिसत आहेत. यामुळे मुंबईत पुढचे दोन तास जोरदार वारे आणि पाऊस अनुभवायला मिळेल. आज रात्रभरात हे परिणाम संपूर्णत: संपतील. दरम्यान वाऱ्याचा वेग 90 ते 100 किमी प्रतितास एवढा असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
तर, निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला असलेला धोका टळला असल्याची माहिती स्कायमेटनं दिलीय. अलिबागच्या किनारपट्टीवर दुपारी एकच्या सुमारास धडकलेलं चक्रीवादळ सध्या ठाणे, पालघर पट्ट्यातून पुढे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे. वादळ मुंबईच्या बाजूनं थोडं पुढे सरकलेलं असलं तरीही लोकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
बीकेसी येथील कोव्हिड सेंटरचं थोडंफार नुकसान
निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरला देखील बसला आहे. कोव्हिड सेंटरच्या बाहेरच्या बाजूने जे पत्रे लावण्यात आले होते. ते वादळामुळे पडले आहेत. यासोबतच या ठिकाणी जे दुसरे कोव्हिड सेंटर बनवण्यात येत आहे, त्याचेही थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले आहे. या संपूर्ण परिस्थितीचा स्थानिक पोलिस प्रशासन आणि महापालिका कर्मचारी यांच्याकडून आढावा घेण्यात येतं आहे.
कोकण किनारपट्टीला सर्वाधिक फटका
निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा कोकण किनारपट्टीला बसला. किनारपट्टीवर धडकल्यानंतर निसर्ग चक्रीवादळाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी पत्रे उडाले, विविध ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचं पाहायला मिळालं. अलिबाग शहर, मुरुड, कोर्लाई भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. विद्युत जोडणीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. रायगड जिल्ह्यात मोबाईल यंत्रणाही विस्कळीत झाली.
रायगड जिल्ह्यातील दिवेआगार आणि श्रीवर्धनलाही चक्रीवादळाचा फटका बसला. रोहा येथील शासकीय गोदामांचे पत्रे उडाले. मुरुडमध्ये वाऱ्यांचा इतका वेग आहे, की घरांचे पत्रे उडून गेले. अलिबागमध्येही वादळी वाऱ्यांमुळे झाडं उन्मळून पडली आहेत, तर कोर्लाईमध्येही घरांचे पत्रे उडाले. उरणमध्ये मुसळधार पावसासह आलेल्या वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं.
Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानं विधानभवन परिसरात झाडं उन्मळून रस्त्यावर