Mumbai : मुंबईकरांचा 31st रात्रभर गाजणार; रेस्टॉरंट, पब पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार, लोकल आणि बसच्याही जादा फेऱ्या
Mumbai New Year Celebration 2025 : 31 डिसेंबरला रात्रभर परवानगी देण्यात आली तरी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आणि मद्यपींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
Mumbai : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत पब, रेस्टॉरंट आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे. दारूची दुकानंही 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र मुंबईत ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येईल. 31 डिसेंबर च्या अनुषंगाने कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. शहरात गेले चार दिवस धुरक्याचे साम्राज्य होते. सोमवारी त्याची तीव्रता कमी झाली आणि पुन्हा हवेत सुखद गारवा पसरला आहे.
मद्यपींवर होणार कठोर कारवाई
थर्टी फर्स्टच्या रात्री मद्यपींवर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात येईल. नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या तरुणाईसाठी शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करण्यात येईल, या शक्यतेतून मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी विभागाने कंबर कसली आहे. या पथकांनी शहरातील ड्रग्ज विक्रेत्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली असून हॉटेल्स, पब्ज, नाइट क्लब, लाऊंज, तसेच फ्लॅट, बंगले, रिसॉर्टवरील पार्थ्यांवरही लक्ष ठेवण्यासाठी खबऱ्यांचे नेटवर्क सक्रिय केले आहे.
सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
शहरातील हॉटेल्स, पब्ज, मॉल्स आणि चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव 15 हजार पोलीस आणि अंमलदार शहरात तैनात आहेत. त्यांच्या बरोबरच सशस्त्र दल, राज्य राखीव दल, बॉम्बशोधक आणि नाशक पथके, श्वान पथके, दंगल नियंत्रक पथके, शीघ्र कृती दल आणि फोर्सवन आदी विशेष पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून राहणार मुंबईकरांवर नजर
गेट वे ऑफ इंडियासह गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, अक्सा, मढ, मार्वे, गोराई या चौपाट्या आणि पवई तलाव आदी ठिकाणी पोलीस उपायुक्तांच्या निगराणीखाली विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुंबई पोलीस आयुक्तालयातील सुसज्ज मुख्य नियंत्रण कक्षातून शहरातील बारीक-सारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
सागरी सुरक्षेवर विशेष लक्ष
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करणार असल्याने तेथे पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांनी समुद्रातील गस्तीमध्ये वाढ केली आहे. तसेच भारतीय तटरक्षक दल आणि नौसेनेकडूनही या काळात विशेष सागरी सुरक्षा कवच पुरवण्यात येणार आहे.
किती फौजफाटा तैनात?
- मुंबई पोलीस दलाकडून वाहतूक विभागासह आठ अपर पोलीस आयुक्त, 29 पोलिस उपआयुक्त, 53 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह 2 हजार 148 पोलीस अधिकारी आणि 12 हजार 48 पोलीस अंमलदार असा बंदोबस्त तैनात.
- पोलिसांबरोबरच महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या प्लाटून, क्यूआरटी टीम, बीडीडीएस टीम, आरसीपी प्लाटून, होमगार्ड्स तैनात
हेही वाचा: