Mumbai Rains News: मुंबईत पाऊस थांबेनाच, रस्त्यांवर गुडघाभर पाणी, शाळांना सुट्टी जाहीर, BMC अलर्ट मोडवर
Mumbai Rain news: मुंबईत तुफान पाऊस, शाळा अर्ध्या दिवसानेच सोडणार. महापालिका यंत्रणा सतर्क, रस्त्यांवर पाणी साचलं, लोकल ट्रेनची वाहतूक उशीरा. मुंबईत पाऊस थांबेनाच

Mumbai Rains News: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु असून सोमवारीही पावसाचा जोर कायम आहे. काल रात्रीपासून सुरु असलेला पाऊस काही केल्या थांबायचे नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे मुंबईतील (Mumbai Rain news) कुर्ला, सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता, अंधेरी, परळ या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईतील किंग्ज सर्कल येथे गुडघाभर पाणी साचले आहे. या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. तर पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंधेरी पश्चिम परिसरात जे पी रोड, मिलन सबवे आणि एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. (Maharashtra weather updates)
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस असला तरी सुट्ट्या असल्यामुळे चाकरमन्यांवर प्रवास करण्याची वेळ आली नव्हती. मात्र, आता सुट्ट्या संपल्याने आज आठड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमनी ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे पहिल्याच दिवशी चाकरमान्यांवर मनस्तापाची वेळ आली आहे. पावसाचा प्रचंड जोर असल्याने मुंबईतील रेल्वेमार्गावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कुर्ला रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळांवर पाणी साचायला लागल्याने चिंता वाढली आहे. दादर रेल्वे स्थानकातही पाणी साचले आहे. पुढील काही तास पाऊस सुरु राहिल्यास रेल्वे रुळ पाण्याखाली जाऊन कुर्ला स्थानकात मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक अद्याप सुरळीत आहे. मात्र, सध्याच्या पावसाचा जोर पाहता येत्या तासाभरात पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत होऊ शकते.
Mumbai School Rain: मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर
सकाळपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने आता मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रातील शाळांमधील मुलांना घरापर्यंत सुखरुप सोडण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.
दक्षिण मुंबई आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच विनाखंड मुसळधार पाऊस सुरु आहे. आज सकाळपासून एकदही सूर्याचे दर्शन झालेले नाही. सध्या मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्या आहेत. सखल भागांमध्ये पाणी साचायला लागल्याने महानगरपालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. पालिकेकडून आता पंपांच्या साहाय्याने पाण्याचा उपसा सुरु आहे.
सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंत्रालयाकडून फ्री वेच्या दिशेने जाणारी वाहतूक मंदावली आहे. अनेक ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाली आहे. पुढील काही तास पावसाची हीच स्थिती कायम राहणार असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याच आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तसेच पाणी भरल्याची घटना कुठे घडली असेल तर इमर्जन्सी नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Navi Mumbai Rain: नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये पाणी शिरले
नवी मुंबईत सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. एपीएमसी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. वाशीतील रस्त्यांवर एक ते दीड फुट पाणी साचले आहे.
आणखी वाचा
























