Mumbai Rain : मुंबई विद्यापीठाच्या उद्याच्या परीक्षा रद्द; अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर ठाणे, नवी मुंबईत शाळांना सुट्टी
Mumbai Rain Update : मुंबई विभागात पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट तर पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला आहे
Mumbai Rain Update : मुंबई विभागात पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट तर पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला आहे. हवामान विभागाने गुरुवारी मुंबई, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या बुधवारी होणाऱ्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईमधील शाळांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या उद्याच्या परीक्षा रद्द -
अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या बुधवारी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करणार आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. उद्या मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्याशाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
ठाण्यात दोन दिवस शाळा बंद -
ठाण्यामधील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील इयत्ता बारावीपर्यंतच्या शाळांना गुरुवार आणि शुक्रवार अशी दोन दिवसांची सुटी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जाहीर केली आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा बद्दल -
आपात्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शिक्षण उपसंचालकांनी परिपत्रक काढले आहे. मुंबईतील स्थानिक परिस्थिती पाहून गुरुवारी सुट्टी देण्याबाबत सक्षम प्राधिकरण यांनी निर्णय घ्यावा, असे परिपत्रकात म्हटलेय. आपत्तीच्या पूर्व सूचनेवरून हवामान खात्याचा अंदाजारून तसेच त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा व त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक क्षेत्रातील शाळांना उद्या सक्षम प्राधिकरण यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारचे परिपत्रक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून काढण्यात आले आहे.
रायगडमध्येही शाळा बंद -
रायगड जिल्ह्यातही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय उद्याची पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील शाळा बंद ठेवण्यात आल्याची माहिती दिली. ज्याठिकाणी मुसळधार पाऊस असेल, तिथे शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालघरमध्ये रेड अलर्ट, शाळांना सुट्टी -
पालघर जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी आहेत.