Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी रोड शोमध्ये सहभाग नोंदवला.
Priyanka Gandhi Road Show नागपूर : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज नागपूरमध्ये दोन रोड शोमध्ये सहभाग घेतला. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधींनी रोड शोमध्ये सहभाग घेतला होता. नागपूरमधील त्यांचा दुसरा रोड शो नागपूर मध्यचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी होता. बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेला रोड शो बडकस चौकात संपला. मात्र, या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर जमले होते. बडकस चौकात भाजपचे कार्यकर्ते जमले होते. याशिवाय काही कार्यकर्ते इमारतीच्या छतावर जमले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे प्रियांका गांधी यांना दाखवले. प्रियांका गांधी यांनी देखील भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा देत महाविकास आघाडी जिंकणार असल्याचं म्हटलं.
प्रियांका गांधी काय म्हणाल्या?
प्रियांका गांधी यांच्या रोड शोला काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते. बडकस चौकात काँग्रेसचा रोड शो आला त्यावेळी तिथं भाजप कार्यकर्ते देखील जमलेले होते. काही जणांनी प्रियांका गांधी आणि नागपूर मध्यचे उमेदवार बंटी शेळके यांना भाजपचे झेंडे दाखवले. तर, बंटी शेळके यांनी हातात तिरंगा झेंडा घेतला होता. इमारतीवर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवताच प्रियांका गांधींनी त्यांना उत्तर दिलं. प्रियांका गांधी म्हणाल्या, भाजपच्या साथीदारांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण महाविकास आघाडीच जिंकणार आहे. प्रियांका गांधी यांनी यानंतर महाराष्ट्र की जय, महाविकास आघाडी की जय अशा घोषणा दिल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील प्रियांका गांधींना जोरदार प्रतिसाद देत घोषणाबाजी केली. यानंतर थोड्याच वेळात रोड शो संपला आणि प्रियांका गांधी तिथून रवाना झाल्या. यावेळी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं.
काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने
प्रियांका गांधी यांचा रोड शो बडकस चौकात संपला. या ठिकाणाहून आरएसएसचं मुख्यालय जवळचं असल्यानं भाजप कार्यकर्ते देखील रोड शोची माहिती मिळताच जमले होते. भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आमने सामने आले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंटी शेळकेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंटी शेळकेंविरोधात घोषणा दिल्या. यावेळी नागपूर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळं दोन्हीकडील कार्यकर्त्यांना बाजूला व्हावं लागलं.
इतर बातम्या :