(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sachin Vaze Case | मुंबई पोलीस आयुक्तांच्या अहवालात परमबीर सिंहांवर ठपका, विरोधानंतरही सचिन वाझेंची नियुक्ती
Sachin Vaze Case | मुंबईत पोलीस आयुक्तांनी गृह विभागाला सादर केलेल्या अहवालात परमबीर सिंह यांच्यावर ठपका ठेवला आहे. तसंच या अहवालात सचिन वाझे गेल्या नऊ महिन्यात पोलीस दलात आल्यानंतर त्याबाबतचा पूर्ण लेखाजोखा देण्यात आला आहे.
मुंबई : सचिन वाझे प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह विभागाला अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरच ठपका ठेवण्यात आला आहे. या अहवालात सचिन वाझे गेल्या नऊ महिन्यात पोलीस दलात आल्यानंतर त्याबाबतचा पूर्ण लेखाजोखा देण्यात आला आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या अहवालातील प्रमुख गोष्टी
- सचिन वाझे यांची नियुक्ती तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केली. त्या समितीत सहपोलीस आयुक्त प्रशासन, अतिरिक्त पोलीस आयुक्त आर्म्ड फोर्स आणि मंत्रालय डीसीपी होते.
- सचिन वाझे थेट मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाच रिपोर्टिंग करत होता. वाझे क्राईम ब्रान्चमधील इतर वरिष्ठांना देखील रिपोर्टिंग किंवा माहिती देत नसत.
- सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्यासाठी तेव्हाचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी विरोध केला तरी सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेण्यात आले.
- सचिन वाझे यांना सशस्त्र पोलीस दल इथे 8 जून 2020 रोजी निलंबन हटवून नियुक्ती देण्यात आली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तत्कालीन सहपोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या आदेशाने गुन्हे गुप्तवार्ता विभागात नियुक्ती देण्यात आली.
- या अहवालानुसार मुंबई पोलीस आयुक्तांच्या तोंडी आदेशावरुन तत्कालीन सह पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी CIU मधील पोलीस निरीक्षक विनय घोरपडे आणि सुधाकर देशमुख यांची बदली केली.
- CIU मधील सचिन वाझे यांच्या नियुक्तीला सहपोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी विरोध केला तरी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या दबावामुळे सचिन वाझेंच्या नियुक्तीला मंजुरी द्यावी लागली.
- सचिन वाझे CIU विभागात काम करत असताना आपले वरिष्ठ युनिट इंचार्ज ACP, DCP, अतिरिक्त पोलीस आयुक्त या सर्वांना सोडून थेट मुंबई पोलीस आयुक्तांनाच रिपोर्टिंग करत होते.
- सचिन वाझे यांना थेट मुंबई पोलीस आयुक्त आदेश देत होते. अनेक महत्त्वाच्या तपासाचे आदेश असे सचिन वाझेंना देण्यात आले. वाझे मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू झाल्यावर नऊ महिन्यात 17 मोठ्या प्रकरणांचा तपास त्यांना देण्यात आला.
- या महत्वाच्या प्रकरणात मंत्र्यांकडे होणाऱ्या ब्रीफिंग बैठकीला मुंबई पोलीस आयुक्तांबरोबर वाझे देखील उपस्थित राहत असत.
- या अहवालात अजून एक बाब नमूद करण्यात आली आहे की सचिन वाझे सरकारी गाड्या उपलब्ध असूनही मर्सिडीज ,ऑडी या गाड्यांमधून पोलीस कार्यालयात येत असत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप दिला होता. आता पोलीस आयुक्तांच्या या अहवालातून परमबीर सिंह यांनीच सचिन वाझेंना पोलीस दलात आणण्यापासून महत्त्वाची कामे दिली हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत.