Mumbai Monorail: अतिभारामुळे मोनोरेल काल पुन्हा रखडली; 50 प्रवाशांना उतरवले, आचार्य अत्रेनगर स्थानकाजवळ नेमकं काय घडलं?
Mumbai Monorail: 21 ऑगस्ट रोजी सकाळी जवळपास 15 मिनिटे आचार्य अत्रेनगर स्थानकात मोनोरेल रखडली होती. 50 प्रवाशांना खाली उतरवून मोनोरेल पुन्हा सुरू करण्यात आली.

Mumbai Monorail मुंबई: मुंबईतील मोनोरेल काल (21 ऑगस्ट) पु्न्हा एकदा अतिभारामुळे रखडल्याचे समोर आले आहे. काल सकाळी जवळपास 15 मिनिटे आचार्य अत्रेनगर स्थानकात मोनोरेल रखडली होती. 50 प्रवाशांना खाली उतरवून मोनोरेल पुन्हा सुरू करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या मुंबईतील मुसळधार पावसात मंगळवारी मोनोरेल अडकल्यानंतर पूर्ण सेवा रात्री विस्कळीत झाली होती. मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्यामुळे मोनोरेल एका बाजूला झुकली होती. त्यानंतर पुन्हा एकदा गुरुवारी अशी काहीशी स्थिती सकाळच्या वेळेला पाहायला मिळाली. गुरुवारी सकाळी सव्वा नऊ साडेनऊच्या सुमारास 109 टन वजन घेऊन अँटॉप हिल्स जवळीत आचार्य अत्रेनगर स्थानकात जवळपास पंधरा मिनिटे रखडली.
मोनोरेल पुन्हा रखडली, कारण काय?
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्यामुळे ही सेवा रखडली असल्याचे सांगितले गेलं. त्यानंतर पन्नास प्रवाशांना आचार्य अत्रे नगर स्थानकाच्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं आणि पुन्हा मनोरेल सेवा 15 ते 20 मिनिटानंतर सुरू करण्यात आली.
मोनोरेल घटनेचा अहवाल द्या, एमएमआरडीएचे आदेश-
चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरून धावणाऱ्या दोन मोनोरेल गाड्या 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी बंद पडल्या. एका मोनोरेल गाडीतील प्रवाशांना तर गाडीचा दरवाजा तोडून क्रेनच्या सहाय्याने काढण्याची वेळ आली. या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बुधवारी महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ (एमएमएमओसीएल) संचालकांना (संचालन) तीन दिवसांत घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.सुरक्षा विभागातील प्रमुखांसह बैठक घेतली. या बैठकीत घटना कशी घडली यावर चर्चा झाली. यात अतिवजनामुळेच या दोन्ही घटना घडल्याचे प्राथमिक स्तरावर समोर आल्याची माहिती सह महानगर आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी दिली.
19 ऑगस्ट रोजी नेमकं काय झालं?
19 ऑगस्ट रोजी हार्बर लाईन विस्कळीत झाल्यानं मोनोरेलमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रवासी होते. मोनोरेल ही मेट्रो पेक्षा आकाराने लहान आहे, त्याशिवाय त्याची प्रवासी संख्या क्षमतासुद्धा कमी आहे. साधारणपणे 520 ते 520 प्रवासी एका वेळेस प्रवास करू शकतात, मात्र काल 582 प्रवासी या मोनो मध्ये प्रवास करत होते. प्रवासी संख्या जास्त झाल्यानं स्टेशनवर मोनो बराच वेळ थांबली होती, कर्मचाऱ्यांकडूनसुद्धा काही जणांना बाहेर येण्याची विनंती केली जात होती. मात्र कोणीही प्रवासी बाहेर येण्यास तयार नसल्यानं मोनोरेल पुढच्या स्टेशनसाठी निघाली. मोनोरेलमध्ये वजन जास्त झाल्यानं वीजपुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा बंद झाल्यानंतर आणि वळणावर मोनोरेल असल्यामुळे मोनोरेलच्या एका बाजूला वजन वाढलं. त्यामुळे एका बाजूला मोनोरेल झुकली. त्यानंतर एसओपी नुसार, अग्निशमन दलाच्या मदतीनं या झुकलेल्या मनोरेल मधूनच आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांचं रेस्क्यू करण्यात आलं.
मुंबईत मोनोरेल अडकली, VIDEO:
संबंधित बातमी:
Mumbai Monorail Stuck: 582 लोकांनी खचाखच भरलेली मोनोरेल अचानक बंद का पडली? समोर आलं महत्त्वाचं कारण
























