(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Measles Disease : मुंबईत गोवरचा विळखा; गोवरची एकूण रुग्णसंख्या 126 वर, 61 बालकं कस्तुरबा रुग्णालयात
मुंबईतील गोवरचा उद्रेक बघायला मिळत आहे. मुंबईतील 12 विभागात रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या एम-पूर्व विभागात असून गोवंडीत रुग्णसंख्या अधिक आहे.
मुंबई : मुंबईत गोवर (MEASLES)आजाराचा विळखा अधिकच वाढतोय. गोवरचे वाढते रुग्ण हा चिंतेया विषय असून कस्तुरबा रुग्णालयात 61 मुलांवर गोवरचे उपचार सुरु आहेत. तर सहा मुलं व्हेंटिलेटर देखील असल्याची माहिती समोर आलीय. मुंबईत काल एका दिवसात गोवर आजाराने ग्रस्त संशयितांची संख्या देखील वाढलीय. तर मुंबईतील (Mumbai Rubella Patient) गोवर रुग्णांची एकूण रुग्णसंख्या 126 वर पोहोचलीय. मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचं समोर आल्यानंतर केंद्राकडून देखील दखल घेण्यात आली आहे,
मुंबईतील गोवरचा उद्रेक बघायला मिळत आहे. मुंबईतील 12 विभागात रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. अनेक संशयित रुग्णांना मुंबईतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या एम-पूर्व विभागात असून गोवंडीत रुग्णसंख्या अधिक आहे. केंद्रीय उच्चस्तरीय समिती गोवरसंदर्भात राज्य सरकारकडे सविस्तर अहवाल देणार आहे. केंद्रीय पथकातील सदस्यांकडून ठिकठिकाणी आढावा घेतल्यानंतर मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
गोवरचा उद्रेक झालेल्या विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज ताप, पुरळ असलेल्या नवीन रुग्णांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांना दुसऱ्या दिवशी पाठपुरावा करणे, अतिरिक्त लसीकरण सत्राचे आयोजन करणे, रुग्ण दाखल करण्याच्या सुविधा वाढविणे, आरोग्य सेविका आणि खासगी डॉक्टरांना गोवरच्या उद्रेकाबाबत अवगत करणे, लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या वयोगटातील विभागवारी
- 0-8 महिने : आठ रुग्ण
- 9 ते 11 महिने : पाच रुग्ण
- 1 ते 4 वर्ष : 31 रुग्ण
- 5 ते 9 वर्ष : 14 रुग्ण
- 10 ते 14वर्ष : एकही रुग्ण नाही
- 15 वर्ष आणि त्यावरील : तीन रुग्ण
- ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या : 06
काय काळजी घ्यावी?
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु करावेत. आरोग्य तपासणीत संशयित रुग्णांना व्हिटामिन ए दिलं जातं.
- लहान बालकांचा आहार चांगला ठेवा आणि स्वच्छता देखील राखावी
- निदानासाठी रक्त आणि लघवीचे नमुने घेतले जातात, स्वॅबद्वारे चाचणी देखील केली जाते
- चाचण्यांच्या आधारे गोवर किंवा रुबेलाचे निदान करण्यास मदत होते
- बालकांचे लसीकरण झालेले नसल्यास डॉक्टरांच्या मदतीने घरोघरी जात सर्वेक्षणामार्फत तपासणी आणि आढावा