Mumbai Local News : हात निसटला अन् सहा महिन्यांची चिमुकली नाल्यात वाहून गेली, अद्याप शोध सुरू; 'असा' घडला अपघात
Mumbai Local News : दोन तास लोकल खोळंबली आणि आईने आपली चिमुकली गमावली.. असा धक्कादायक प्रकार बुधवारी कल्याणजवळ घडला.
ठाणे: कल्याणच्या पत्रीपुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर घडलेल्या घटनेने कल्याण-डोंबिवलीसह सर्वच जण हळहळले. ट्रॅकवर उतरून चालत स्टेशन गाठण्याच्या प्रयत्नात अवघ्या सहा महिन्यांची चिमुकली हातून निसटली आणि नाल्यात पडून वाहून गेली. रिषिका रुमाले असे या चिमुकलीचे नाव आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच आपत्कालीन कक्षाचे कर्मचारी या चिमूरडीचा नाल्यात आणि खाडीत शोध घेत आहेत. मात्र नाल्यातील पाण्याचा वेग जास्त असल्याने संध्याकाळी उशिरा पर्यंत या चिमूरडीचा शोध लागू शकला नाही. कल्याणच्या पत्रीपुलाजवळ आज दुपारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वानाच मोठा धक्का बसला.
बुधवारी सकाळपासून कल्याण डोंबिवलीला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. मूळची हैद्राबादची असलेली योगीता रुमाले भिवंडी धामनगाव परिसरात राहणाऱ्या आपल्या आई वडिलांकडे प्रसूतीसाठी आली होती. दरम्यान रिषीका हिची जन्मापासून मुंबईतील रुग्णालयात ट्रीटमेट सुरू असल्याने मागील सहा महिन्यांपासून ती आपल्या वडिलांकडेच राहत होती.
नेहमीप्रमाणे योगीता आपल्या वडिलांसमवेत बुधवारी सकाळी मुलीला घेऊन तपासणीसाठी गेली होती. दुपारी काम आटोपून ती अंबरनाथ लोकलने निघाली. मात्र पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती. ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान एका मागोमाग एक लोकल रांगेत उभ्या राहिल्या होत्या. बराच वेळ होऊनही लोकल जागेवरून हालत नसल्याने अखेर त्यातील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून चालत कल्याण स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला.योगीता देखील आपल्या काकांसमवेत ट्रॅक मधून चालत येत होती. चिमूरड्या रिषिका हिला आजोबांनी छातीशी धरले होते. मात्र पुढे उभी असलेली लोकल नाल्याच्या अगदी जवळ असल्याने या लोकलच्या बाजूने असलेल्या अरुंद पाईपवरुन चालताना आजोबांचा पाय घसरला आणि त्यांच्या हातातील चिमूरडी थेट नाल्यात पडली.
काकांच्या हातातील चिमूरडी पाण्यात पडलेली पाहताच योगीताने हंबरडा फोडला. मात्र नाल्याच्या पाण्याचा प्रवाह खूपच जास्त असल्याने ही चिमूरडी पाण्यात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच कल्याण आणि डोंबिवली रेल्वे पोलिसानी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तर शिवसेना आपत्कालीन कक्षाची टीम देखील मदतीसाठी पोचली. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत शोध घेऊन देखील चिमूरडीचा शोध लागू शकला नाही.
आईचा आक्रोश पाहून पाणावले इतरांचे डोळे...
आपल्या पोटचा गोळा पाण्यात पडल्याचे समजताच ती माय तर धाय मोकलून रडू लागली. आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी ती अक्षरशः त्या नाल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती. तर हा सगळा प्रसंग घडत असताना तो पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच अश्रूंचा बांध फुटला. त्या आईच्या आर्त किंकाळीने सर्वांचेच काळीज अक्षरशः पिळवटून टाकले.
दरम्यान प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून स्थानिक कोळी बांधव, अग्निशमन दलाकडून बाळाचा कसून शोध घेतला जात आहे. तर काही तरी चमत्कार व्हावा आणि हे बाळ सुखरूप मिळावे अशी मनोमन प्रार्थनाही सर्वजण करीत आहेत.
ही बातमी वाचा: