मुंबईच्या लाईफलाईनला थंडीचा फटका
विविध ठिकाणी रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे सर्वच लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. सकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला समोर जावं लागलं.
मुंबई : मुंबईतील थंडीचा फटका मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वेला बुधवारी बसला. विविध ठिकाणी रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे सर्वच लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. सकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला समोर जावं लागलं.
मध्य रेल्वेवर सायन-माटुंगादरम्यान आणि ठाणे-मुलुंडदरम्यान कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावर रुळाला तडे गेले. त्यामुळे दोन वेळा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
तर नेरळ स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने सीएसएमटीकडे येणारी वाहतूकही विस्कळीत झाली होती. यासर्व कारणांमुळे कल्याण आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्वच धीम्या आणि जलद गाड्या उशिराने धावत आहेत.
ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी स्थानकात रुळाला तडे गेल्याने ठाण्याकडे येणारी वाहतूकही विस्कळीत झाली होती.
पश्चिम रेल्वेवर वानगाव आणि बोईसरदरम्यान रुळाला तडे गेल्याने डहाणू आणि गुजरातकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. सर्व बिघाड दुरुस्त करण्यात आले आहेत, मात्र गाड्या अजूनही उशिराने धावत आहेत.