जैन मंदिरांचे डायनिंग हॉल नऊ पवित्र दिवसांसाठी उघडण्यास हायकोर्टाची सशर्त परवानगी
जैन मंदिरांचे डायनिंग हॉल नऊ पवित्र दिवसांसाठी उघडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे.हॉटेल, बार इथं परवानगी देता मग धार्मिक कार्यासाठी का नाही? असं म्हणत राज्य सरकारचा विरोध हायकोर्टानं नाकारला आहे.
मुंबई : जैन धर्मातील पवित्र आयंबिल ओली आराधनेसाठी जैन मंदिरांतील डायनिंग हॉल्स उघडण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. हे हॉल उघडण्यासाठी विरोध करणार्या राज्य सरकारचा हायकोर्टानं चांगलाच समाचार घेतला. हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सशर्त अटींवर सुरू करण्यास परवानगी दिली जाते तर धार्मिक कार्यासाठी का दिले जात नाही?, असा सवाल उपस्थित करत 23 ते 31 ऑक्टोबर या नऊ दिवसांच्या कालावधीत सशर्त अटींसह परवानगी दिली आहे. ही परवानगी मुंबईतील सुमारे 48 डायनिंग हॉल्स उघडण्यासाठी लागू राहील. मुंबईतील जैन मंदिरं खुली करण्यास परवानगी द्या, अशी विनंती करणारी याचिका श्री ट्रस्टी आत्मा कमल लब्धीसुरीश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रफुल्ल शहा यांच्यावतीने आधीच दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेत ट्रस्टच्यावतीने अॅड. कैवल्य शाह आणि गुंजन शाह यांनी नव्याने अर्ज दाखल करून या नऊ दिवसांसाठी डायनिंग हॉल्स उघडण्याची परवानगी द्या अशी विनंती उच्च न्यायालयाला केली होती.
या याचिकेवर हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी पार पडली. त्यावेळी अर्जदारांच्यावतीने अॅड प्रफुल्ल शहा यांनी जैन धर्मातील पवित्र आयंबिल ओली आराधनेचा उत्सवाबाबत माहिती दिली. या उत्सवांतर्गत जैन भाविकांच्या उपवासाच्या विशेष भोजन व्यवस्थे केली जाते. त्यासाठी मंदिरांतील डायनिंग हॉल्स जे सर्वसाधारण 1000 ते 1500 चौरस फूटांचे आहेत ते सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत खुले केले जातील. तसेच प्रत्येक भाविकाला एक तासाच्या प्रवेशासाठी पास दिला जाईल. याद्वारे तिथं गर्दी होणार नाही जेणेकरून कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन पूर्ण केले जाईल, अशी हमी ही न्यायालयाला देण्यात आली. यावेळी राज्य सरकारनं मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे डायनिंग हॉल्स खुले करण्यास विरोध केला. मात्र त्यावर हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली. हॉटेल,बार आणि रेस्टॉरंट सशर्त अटींवर सुरू करण्यास परवानगी दिली जाते तर मग अश्या पवित्र धार्मिक कार्यासाठी डायनिंग हॉल्स उघडण्यास का परवानगी दिली जात नाही?, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे राज्य सरकारचा विरोध नाकारत मुंबईतील 48 जैन मंदिरांना नऊ दिवसांसाठी डायनिंग हॉल खुले करण्याची परवानगी दिली. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग तसेच अन्य नियमांचे पालन करा असे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले आहेत.