Mumbai Rain Updates: मुंबईच्या पावसाचा आमदारांना फटका, मंत्र्यांना रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची वेळ, अमोल मिटकरींचा व्हीडिओ व्हायरल
Mumbai News: मुंबईत लोकल ट्रेनचा खोळंबा झाला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे व्यवस्था कोलमडली. याचा फटका सामान्य रेल्वे प्रवाशांसोबत आमदार आणि मंत्र्यांनाही बसताना दिसत आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वेमार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत
मुंबई: गेल्या काही तासांमध्ये मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासूनच मुंबईची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवा कोलमडून पडली आहे. मध्य रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे सकाळपासून लोकल ट्रेनचे (Mumbai Local Train) वेळाकपत्रक कोलमडले आहे. इतकेच नव्हे तर यामुळे बाहेरुन येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही (Express Train) खोळंबा झाला आहे. याचा फटका सामान्य रेल्वे प्रवाशांसोबत आमदार आणि मंत्र्यांनाही बसताना दिसत आहे. सायन स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साठून एक्स्प्रेस ट्रेन अडकून पडल्याने राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना रेल्वे ट्रॅकवरुन चालण्याची वेळ आली.
काहीवेळापूर्वीच अमोल मिटकरी आणि अनिल पाटील यांचा एक व्हीडिओ समोर आला. यामध्ये अमोल मिटकरी त्यांच्या परिस्थितीबाबत माहिती देताना दिसत आहेत. आणखी आठ ते दहा आमदार आम्ही असलेल्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आज आम्ही वेगळा अनुभव घेतोय. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा अंतिम आठवडा आहे. रेल्वेची वाहतूक लवकर सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले. काहीवेळ पायपीट केल्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी आणि मंत्री अनिल पाटील कुर्ला ईस्ट नेहरूनगर पोलीस चौकीत येऊन बसले आहेत. मात्र, पावसामुळे रस्त्यावरही वाहतूक कोंडी असल्याने त्यांना लगेच मुंबईच्या दिशेने रवाना होणे शक्य नाही. त्यामुळे ते आता अधिवेशनाला कसे पोहचणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होत आहे. त्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसने अनेक आमदार मुंबईत येत होते. मात्र, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकाजवळ अडकून पडली आहे. या ट्रेनमध्ये अनेक आमदार अडकून पडल्याची माहिती आहे.
मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता
मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे आमदार व मंत्री पोहचले नसल्यास कामकाज काही वेळेसाठी स्थगित केले जाईल, असे सांगितले जात आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे आज नाशिक मुंबई महामार्गावरच्या खड्ड्यांच्या अनुषंगाने होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या दालनात बैठकीचा आयोजन केले होते. बैठकीसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, मुसळधार पावसामुळे अनेक नेते पोहोचू शकत नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे उद्या किंवा परवा या बैठकीचा आयोजन करण्यात येणार आहे.
आणखी वाचा