Mumbai Dahi Handi: दोघांना खांद्यावर घेऊन दहीहंडीत तीन एक्के लावले पण उतरताना डोक्यावर पडला, पवईचा गोविंदा आनंद दांडगेची प्राणज्योत मालवली
Mumbai Dahi Handi: विक्रोळीत आमदार सुनील राऊत यांनी आयोजित केलेल्या दही हंडीत एक गोविंदा खाली कोसळला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Mumbai Dahi Handi: विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 25 लाखांच्या भव्य दहीहंडी उत्सवात एक दुर्दैवी घटना घडली होती. दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या पवईच्या गोविंदा पथकातील आनंद सुरेश दांडगे (26) हा युवक खाली कोसळून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर विक्रोळीतील सुश्रुषा या खाजगी रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. मात्र त्याचा काल शनिवारी (दि. 23) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पवईमधील गोखले नगर गोविंदा पथक सहभागी झाले होते. आनंद दांडगे हे या पथकातील गोविंदा चौथ्या थरावर चढले असताना, खाली उतरताना "तीन एक्के" घेऊन उतरताना तोल गेल्याने ते खाली कोसळले.
गोविंदा आनंद दांडगेची प्राणज्योत मालवली
अपघातात आनंद यांच्या डोक्याला व मानेला गंभीर इजा झाली. त्यांना तात्काळ कन्नमवार नगरमधील आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना सुश्रुषा हॉस्पिटल, विक्रोळी येथे हलवण्यात आले. 16 ते 23 ऑगस्ट दरम्यान सात दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2:31 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांकडून मृत्यूची नोंद
या प्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा अपघाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास सुरू असून, मयताचे शवविच्छेदन राजावाडी रुग्णालय, घाटकोपर येथे करण्यात आले आहे.
मुंबईतील दहीहंडी उत्सवात 318 गोविंदा जखमी
दरम्यान, राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत जय जवान पथकाने 10 थर रचत नव्याने विक्रम केला असून मुंबईतील इमारतीप्रमाणे मुंबईच्या गोविंदा पथकाचे उंचच उंच मनोरे पाहून चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. दरम्यान, मुंबईतील दहीहंडी उत्सवात तब्बल 318 गोविंदा जखमी झाले होते . तर दोन गोविंदांचा मृत्यू झाला होता. मनोऱ्यावरुन पडल्याने एकाचा मृत्यू झाला होता तर एका गोविंदाचा मृत्यू काविळने झाला होता. तसेच दहीहंडीसाठी रोप बांधताना तोल गेल्याने खाली पडून एका गोविंदाला आपला जीव गमवावा लागला होता. विक्रोळीत आमदार सुनील राऊत यांनी आयोजित केलेल्या दही हंडीत गोविंदा आनंद सुरेश दांडगे खाली कोसळला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आणखी वाचा
























