कोरोनामुळं मृत झालेल्या पत्नीला भेटू दिले नाही, म्हणून त्याने केली चोरी...
मालकाने नोकराला त्याच्या पत्नीला भेटू दिले नाही म्हणून नोकराने मालकाच्या घरात चोरी केली. याप्रकरणी फिर्याद नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपी नोकर आणि त्याच्या साथीदाराला बिहार येथून अटक केली असून आरोपींकडून चोरलेली रोकड व दागिने जप्त केले आहेत.
मुंबई : मुंबईतील कांदिवली भागात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे मालकाने नोकराला त्याच्या पत्नीला भेटू दिले नाही म्हणून त्याने मालकाच्या घरात चोरी केली. याप्रकरणी फिर्याद नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपी नोकर आणि त्याच्या साथीदाराला बिहार येथून अटक केली असून आरोपींकडून चोरलेली रोकड व दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीनचंद्र मिस्त्री कांदिवलीच्या विश्व मिलन सोसायटीत राहतात. ते गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांची एक मुलगी अंधेरी येथे काम करते. तिने वडिलांची देखभाल करण्यासाठी श्याम सुंदर यादव नावाच्या व्यक्तीला कामावर ठेवले होते, पण श्याम सुंदरच्या भावाचे लग्न 15 एप्रिल रोजी निश्चित झाल्यानंतर श्याम सुंदर आपल्या गावी गेला होता. त्याने जाण्यापूर्वी मिस्त्री यांची काळजी घेण्यासाठी त्याचा मित्र अनिल यादवला कामावर ठेवले.
13 दिवसानंतर जेव्हा अनिल यादवला कोरोनामुळे आपल्या पत्नीच्या मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. तेव्हा अनिलने आपल्या पत्नीच्या मृत्यूचे कारण सांगून मालकास घरी जाण्यास परवानगी मागितली. पण आजारी नवीन ॉचंद्र मिस्त्री यांनी नकार दिला. पत्नीला शेवटचं पाहता यावा म्हणून मालकाने गावी जाऊ न दिल्याचा मनात राग धरून अनिलने 28 एप्रिल रोजी मालकाच्या घरी चोरी केली आणि गावी पळून गेला. 1 मे रोजी जेव्हा नवीनचंद्र मिस्त्री यांची मुलगी दर्शनी सोलंकी घरी आली तेव्हा तिने पाहिलं की कपाटाचं दार उघडं असून त्यातून घरात ठेवलेले 7 लाख 50 हजाराचे सोने-चांदीचे दागिने आणि 40 हजारांची रोकड गायब आहे.
दर्शनीच्या तक्रारीनंतर कांदिवली पोलिस चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आपल्या खबऱ्यांच्या आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपी श्याम सुंदर आणि अनिल यांना बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून अटक केली. त्यांच्याकडून 2 तोळे सोनं आणि 3 लाखांची रोकड जप्त केली आहे. सध्या श्यामसुंदर आणि अनिल दोघेही पोलिस कोठडीत आहेत.