(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime : बॅण्डस्टॅण्डवर गर्लफ्रेण्डला जीवे मारण्याचा प्रयत्न; गळा दाबून, डोकं आपटून प्रेयसीला गटारात बुडवण्याचा प्रयत्न करणारा तरुण अटकेत
Mumbai Crime : प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दरम्यान मारहाण झालेल्या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे.
Mumbai Crime : प्रेयसीला (Girlfriend) जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) एकाला अटक केली आहे. प्रेमी युगुलांचं पसंतीचं स्पॉट असलेल्या वांद्र्यातील बॅण्डस्टॅण्ड (Bandstand) इथे बुधवारी (31 मे) ही घटना घडली. आरोपीने प्रेयसीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तिचं डोकं जमिनीवर आदळलं. इतक्यावरच तो थांबला नाही. त्याने तिला गटारात बुडवण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान मारहाण झालेल्या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे.
तुझ्याशी लग्न करण्यासाठी मी धर्मपरिवर्तन केलं. हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारला, असं आरोपी हल्ला करण्यापूर्वी म्हणाल्याचं प्रेयसीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. आरोपी प्रियकराने प्रेयसीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. परंतु तिने नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकाने तिला मारण्याचा प्रयत्न केला.
लग्नासाठी धर्मांतर केल्याचा आरोपी तरुणाचा दावा
लुबना जावेद सुक्ते (वय 28 वर्षे, रा. कोणगाव, कल्याण) ही तरुणी आणि आकाश मुखर्जी (रा.खडकपाडा, कल्याण) हा तरुण यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर पीडित तरुणीने वांद्रे पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी इथे फिरुन आल्यानंतर ते संध्याकाळी वांद्र्यातील बॅण्डस्टॅण्ड इथे पोहोचले. इथे पोहोचल्यानंतर आरोपी आकाश मुखर्जी लुबना सुक्तेला म्हणाला की, तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी मी हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारला. धर्मपरिवर्तनाचं प्रमाणपत्र तुझ्या काकीला दाखवून लग्नासाठी परवानगी घेऊया.
शारीरिक संबंधांना नकार दिल्याने मारहाण
रात्री दहाच्या सुमारास लुबनाने आपण आता घरी जाऊया असं त्याला म्हटलं. यानंतर आकाश मुखर्जीचं वर्तन पूर्णपण बदललं. तो म्हणाला की, आता नाही, थोडा वेळ थांब. आता आपण शारीरिक संबंध ठेवूया. मी तुला घरी सोडेन. परंतु तिने आकाशची ही मागणी धुडकावली आणि आपल्याला घरी जायचंय असू बोलून रडू लागली. यानंतर आकाश मुखर्जीने तिचा गळा आवळला. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केल्यानंतर त्याने तिचे केस ओढले आणि तिचं डोकं जमिनीवर आदळले. नंतर तिला गटारात बुडवण्याचाही प्रयत्न केला. तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला आणि त्यानंतर स्थानिक लोक तिथे पोहोचले. पण मी सतत खडकांवर पडतोय, असं आकाशने त्यांना खोटं सांगितलं. परंतु तो आपल्याला मारहाण करत असल्याचं तरुणीने लोकांना सांगितलं. त्यानंतर मुखर्जीने समुद्राच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती परिमंडळ 9 चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली.
हेही वाचा
Pune Crime News : प्रेयसीने प्रियकराची हत्या का केली? वाघोलीतील हत्येचा धक्कादायक उलगडा