भिवंडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करत बलात्कार, दोघांना अटक, संतप्त जमावाकडून दगडफेक
भिवंडी शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला मोबाईल तसेच पैशांचं आमिष दाखवत तिच्या घरातून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे संतप्त जमावाने दगडफेक करीत तोडफोड केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.
भिवंडी : भिवंडी शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला मोबाईल तसेच पैशांचं आमिष दाखवत तिच्या घरातून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपहरण, बलात्कार व पॉक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे. संतोष सोनी आणि इरशाद अन्सारी असे अटक आरोपींची नावे आहेत. मात्र या प्रकरणामुळे संतप्त जमावाने आरोपीचे हॉटेल तसेच पानपट्टीची दगडफेक करीत तोडफोड केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सध्या परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
माहितीनुसार आरोपी संतोष सोनीचा पानपट्टीचा व्यवसाय असून त्याने पीडित मुलीला पैसे तसेच मोबाईलचे आमिष दाखवत 12 नोव्हेंबर रोजी घरातून अपहरण करत तिला स्वतःच्या घरात कोंडून ठेवलं होतं. मात्र ही बाब मुलीच्या वडिलांना माहिती पडताच त्यांनी तात्काळ पानपट्टी व्यवसायिक संतोष सोनी याच्याकडे धाव घेतली. मात्र संतोष सोनी तसेच इरशाद अन्सारी यांनी धमकी देत वडिलांना हाकलून लावलं. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी 21 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध घेत मुलीला वडिलांच्या हवाली केलं. मात्र वैद्यकीय तपासणी केली असता मुलीसोबत अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आज दोघांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि संतप्त जमावाने दिवानशाह परिसरात आरोपींचे असलेले हॉटेल व पानपट्टीवर दगडफेक करत तोडफोड केली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जवळपास अर्धा तास चाललेल्या या तोडफोडीनंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात तणावाचे वातावरण असल्याने सध्या पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.