(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Costal Road: मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट मिळणार? नोव्हेंबरमध्ये कोस्टल रोड खुला होण्याची शक्यता
Mumbai Costal Road: मुंबई महापालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे काम पूर्ण होत असून नोव्हेंबरमध्ये वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे.
Mumbai Costal Road: मुंबई महानगरपालिकेचा (BMC) आतापर्यंतचा सर्वाधिक महत्त्वकांक्षा असलेला कोस्टल रोड प्रकल्पाचे (Mumbai Costal Road) काम जोरात सुरू आहे. आतापर्यंत याच कोस्टल रोडचे 76 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण होण्यास नोव्हेंबर 2023 पर्यंत वाट बघावी लागेल. हे काम पूर्ण झाले तर मुंबईकरांना दिवाळीत कोस्टल रोडचे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
तब्बल साडेबारा हजार कोटी रुपये खर्च करून मुंबईचा कोस्टल रोड अस्तित्वात येत आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दक्षिण भाग आणि उत्तर भाग या दोन भागात विभागला गेला आहे यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं आहे. त्याचे 76 टक्के काम पूर्ण झाले आहे. मरीन लाईन्सपासून प्रियदर्शिनी पार्कपर्यंत बोगदातून प्रवास केल्यानंतर पुढील कोस्टल रोड हा भराव टाकलेल्या जमिनीवर आहे. त्यात देखील नरिमन पॉईंट प्रमाणेच सी फेस तयार करण्यात येत आहे. समुद्राला लागूनच बसण्यासाठी कठडा, त्या बाजूला चालण्यासाठी मोठी जागा, बाजूला दक्षिण आणि उत्तर दिशेच्या मार्गिका आणि त्यापुढे जी जागा पुरते त्यावर ग्रीन स्पेस तयार करण्यात येत आहे. हा सी फेस म्हणजेच प्रोमनाड सलग साडेसात किलोमीटर लांब असणार आहे.
कोस्टल रोडसाठी बनवण्यात येत असलेल्या बोगद्याचे काम आता शंभर टक्के पूर्ण झाले आहे. दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी मालिकेसाठी दोन वेगवेगळे बोगदे तयार करण्यात आले आहेत. हे दोन्ही बोगदे भारतातील सर्वात मोठे टीबीएम मशीनने खोदलेले बोगदे आहेत. यामध्ये आग लागलीच तर बोगद्यावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी आणि आपात्कालीन परिस्थिती असेल तर पटकन दुसऱ्या बोगद्यात जाता यावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आले आहेत.
पुढच्या शंभर वर्षांसाठीच्या नियोजनातून या कोस्टल रोडची प्लॅनिंग करण्यात आली आहे. हा कोस्टल रोड ज्या बोगद्यातून जाणार आहे, त्या रस्त्याच्या खालूनदेखील एक छोटा बोगदा युटिलिटी केबल्स आणि अग्निशमन यंत्रणेसाठी तयार करण्यात आला आहे. इथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. मात्र, येणाऱ्या काळात हाच छोटा बोगदा खूप महत्त्वाचे काम बजावणार आहे.
प्रकल्पाची एकूण प्रगती
भौतिक - 76 टक्के
आर्थिक - 69 टक्के
बोगदा खोदकाम - 100 टक्के
पुनः प्रपण - रिकलेमेशन - 95 टक्के
समुद्र भिंत - 84 टक्के
आंतर बदल - interchange - 57 टक्के
पूल - 60 टक्के
मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल. दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीला असून प्रकल्पाचा 76 टक्के काम पूर्ण झालं आहे. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प असणार आहे. एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे. यामध्ये 15.66 किमी चे तीन इंटरचेंज आणि प्रत्येकी 2.7 किमीच्या एकूण दोन बोगद्यांचा समावेश असणार आहे. कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत आणि 34 टक्के इंधन बचत होईल. त्याशिवा, ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणातही घट होईल असा दावा करण्यात येत आहे.
कोस्टल रोड हा 111 हेक्टर जागेवर भराव टाकून बनवण्यात आलेला आहे. समुद्रात टाकलेल्या या भरावामुळे नैसर्गिक आपत्ती वेळी आणि पावसाळ्यात समुद्र पुन्हा या कोस्टल रोडच्या मार्गात येऊ शकतो अशी शंका अनेकांनी व्यक्त केली होती. त्यावर उपाय म्हणून सी वॉल बनवण्यात आली आहे. त्यामुळे समुद्राच्या तुफान लाटांची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. ज्या ठिकाणी कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंक प्रकल्पाला जोडला जातो त्या ठिकाणचे काम देखील आता वेगाने सुरू आहे. याच ठिकाणी वरळीतील मच्छिमार बांधवांनी मागणी केल्याप्रमाणे 120 मीटर अंतर असलेला पिलर उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे कोळीवाड्यातील विरोध मावळला आहे.