(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पहिल्या कौलनुसार महायुतीला 148 जागांवर आघाडी मिळाली असून 127 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.
मुंबई : राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात 93 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत भाजपच मोठा भाऊ ठरत असल्याचे पाहायला मिळते. तर, महायुतीने मॅजिक फिगर गाठला असून पहिल्या फेरीतील कौल महायुतीच्या बाजुने असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर असल्याची माहिती आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी 288 जागांपैकी 145 जागांवर मॅजिक फिगरचा आकडा आहे. त्यामुळे, सत्तास्थापनेसाठी कोणत्याही युती व आघाडीला 145 चा आकडा गाठावा लागणार आहे. निकालाचे पहिले कौल हाती आले असून बहुतांश जिल्ह्यात भाजपला आघाडी दिसून येते. भाजप महायुतीने दीडशतकाच्या जवळपास झेप घेतल्याचं दिसून येतं.
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पहिल्या कौलनुसार महायुतीला 148 जागांवर आघाडी मिळाली असून 127 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. तर, इतरांमध्ये 13 जागांवर आघाडी असून मनसेचे दोन उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती आहे. पहिल्या फेरीअखेर सकाळी 9.00 वाजेपर्यंत हाती आलेल्या कौलनुसार, भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसून येते. भाजपला 93 जागांवर आघाडी असून महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला 30 जागांवर आघाडी मिळताना पाहायला मिळत आहे. तर, अजित पवारांच्या 25 उमेदवारांना आघाडी असल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीचा विचार केल्यास मविआमध्ये काँग्रेसने बाजी मारली असून काँग्रेसला 45 जागांवर आघाडी मिळाली असून 38 जागांवर शिवसेना ठाकरे गटाला आघाडी मिळाली आहे. महाविकास आघाडीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 46 जागांची आघाडी आहे. त्यामुळे, अंत्यंतच अटीतटीचा सामना येथे पाहायला मिळत असून महायुती व महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर असल्याचे दिसून येते.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक निकालाची सुरुवात झाली असून अत्यंत चुरशीची लढत यंदा पाहायला मिळत आहे. यंदाच्या निवडणूक निकालानंतर राज्यात इतर व अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असेच दिसून येते. इतर व अपक्षांचा आकडा वाढल्यास राज्यात किंगमेकरच्या भूमिकेत राहू शकतात. मात्र, याबाबतचे चित्र निवडणूक निकालाच्या अंतिम आकडेवारीनंतरच स्पष्ट होईल.
हे ठरू शकतात पहिले विजयी उमेदवार
महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आणि 99 विधानसभेच्या रिंगणात असलेले भाजपचे नेते कालिदास कळमकर हे यंदाच्या निवडणुकीत पहिला विजयाची नोंद करण्याच्या तयारीत आहेत. वडाळा मतदारसंघात कालिदास कोळमकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे पहिल्या कलानुसार कालिदास कोळमकर जवळपास 12000 मतांनी आघाडीवर आहेत, या मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार श्रद्धा जाधव आहेत.