(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Pollution : मुख्यमंत्र्यांनी कारची काच खाली करून प्रवास करावा; डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीने हैराण कांजूरवासियांचा संताप
Mumbai Air Pollution : कांजूर डम्पिंग ग्राउंडमुळे विक्रोळी पासून ते मुलुंडपर्यंत प्रदूषण तर वाढलेच शिवाय या संपूर्ण भागामध्ये दुर्गंधी मागील अनेक दिवसांपासून पसरलेली पाहायला मिळत आहे.
मुंबई : एकीकडे मुंबईचा प्रदूषण (Mumbai Pollution) वाढतंय तर दुसरीकडे पूर्व उपनगरात कांजुरमार्ग (Kanjurmarg) डम्पिंग ग्राउंडमुळे (Dumping Ground) स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या सगळ्या विरोधात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पर्यावरणवाद्यांनी तक्रार दाखल केली आहे. मुंबईतल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दिवसाला जवळपास 5 हजार मेट्रिक टन इतका कचरा या डम्पिंग ग्राउंडमध्ये येतोय आणि त्यामुळे विक्रोळीपासून (Vikroli) ते मुलुंडपर्यंत (Mulund) प्रदूषण तर वाढलेच शिवाय या संपूर्ण भागामध्ये दुर्गंधी मागील अनेक दिवसांपासून पसरलेली पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणाहून प्रवास करताना कारची काच खाली करून प्रवास करावा अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
106 हेक्टर परिसरात हे कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड पसरलेला आहे. आजूबाजूला कांदळवन, पूर्व द्रुतगती मार्ग आणि लगतच विक्रोळी भांडुप कांजूरमार्ग नाहूरचा रहिवासी भाग आहे. रोज या डम्पिंग ग्राउंडमध्ये मुंबईतील 5000 मॅट्रिक टनपेक्षा अधिक कचरा टाकला जात आहे. या सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट बायोरिऍक्टर पद्धतीने केली जात असताना ओला आणि सुका कचरा याचं कुठलंही वर्गीकरण केलं जात नसल्याचं पर्यावरणवाद्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रदूषणांविरोधात तातडीने ॲक्शन मोडमध्ये काम करण्यात यावं यासाठी पर्यावरणवाद्यांनी थेट केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
कचऱ्याचे वर्गीकरण नाही...डम्पिंगमुळे प्रदूषणात वाढ
ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात नसल्याने इथेच तो कुजतो आणि त्यामुळे दुर्गंधी सुटते शिवाय मिथेन वायूचा थर जमा होत असल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पर्यावरणवादी दयानंद स्टॅलिन यांनी म्हटले. विक्रोळीपासून ते मुलुंडपर्यंत या डम्पिंग ग्राउंडचा दुर्गंधीचा वास पसरत असल्याने सुगंधी द्रव्याची फवारणी या दुर्गंधी पासून मुक्तता व्हावी म्हणून मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. मात्र, ही फवारणी करूनसुद्धा दुर्गंधी जात नसल्याने आजारांचा सामना करावा लागत असल्याचं स्थानिकांचे म्हणणे आहे.
दुर्गंधी कशी पसरतेय हे आपण पाहतोय. मुख्यमंत्री जेव्हा ठाण्याला जातात तेव्हा त्यांनी एकदा या ठिकाणाहून जाताना आपल्या कारची काच खाली करावी आणि त्रास बघावा, अशी संतापजनक प्रतिक्रिया स्थानिक मामा मांचेकर यांनी दिली.
घरांसाठी कोट्यवधी मोजले, पण दुर्गंधीने त्रास वाढवला...
या भागात राहता यावं यासाठी करोडो रुपये खर्च करून उच्चभ्रू सोसायटीमध्ये लोकांनी घर घेतली. मात्र, करोड रुपये खर्च करून सुद्धा अशा दुर्गंधीमध्ये या लोकांना राहावं लागत असल्याने वारंवार तक्रारी या स्थानिकांकडून केल्या जात आहेत. हे डम्पिंग ग्राउंड तळोजाला हलवण्याचे मध्ये योजले असताना नंतर कुठले हालचाली झाल्या नसल्याची माहिती आहे. तर अनेक लेखी तक्रार येऊन सुद्धा सुगंधी द्रव्यची फवारणी मारून या तक्रारीकडे मुंबई महापालिकेकडून काना डोळा केला जात असल्याची तक्रार आहे.
दीड ते दोन कोटी रुपयांना या चांगल्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतले मात्र ज्या प्रकारे दुर्गंधी येते ते पाहता जेवण सुद्धा जात नाही. अनेक जण आजारी आहेत प्रदूषण मुंबईची वाढले आहे तक्रारी करून सुद्धा कुठली ॲक्शन घेतली जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली.
मुंबई प्रदूषण वाढत असताना वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलीही हालचाल प्रशासनाकडून होत नसल्याने या त्रासात स्थानिकांना राहावं लागते त्यामुळे तातडीने प्रशासनाने या सगळ्याची दखल घ्यावी आणि यातून मुक्तता करावी हीच अपेक्षा आता या सर्व स्थानिकांची आहे.